अबब... मनपाचे सावेडीतील मंगल कार्यालय गेले चोरीला
चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसच्या दशरथ शिंदेंची मागणी
अ - प्राईड वेबन्यूज टीम : अहमदनगर महानगरपालिकेच्या निधीतून वैदूवाडी येथे सार्वजानिक मंगल कार्यालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र हे मंगल कार्यालया चोरीला गेले आहे की काय असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे नेते, माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे समक्ष भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
घडले असे की, सावेडीच्या वैदुवाडी भागात गेल्या अनेक वर्षांपासून मंगल कार्यालय उभे होते. मनपाच्या निधीतून याची उभारणी करण्यात आली होती. परिसरातील नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी याचा उपयोग होत होता. परंतु चांगल्या अवस्थेत असलेल्या या मंगल कार्यालयाची कोणीतरी मोडतोड करून मंगल कार्यालय दोन जेसीबी लावून पूर्णतः जमीनोदोस्त केले आहे. मंगल कार्यालयाचे पत्रे, लोखंड, खिडक्या, राडारोडा, खुर्च्या, टेबल, मंडप साहित्य, सतरंज्या आदी साहित्याची दिवसाढवळ्या चोरी केली गेली असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
याबाबत शिंदे यांनी काँग्रेसच्या वतीने मनापाचे लक्ष वेधले आहे. याचे फोटो त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सादर केले आहेत. यापूर्वी देखील जून महिन्यात शिंदे यांनी मनपाकडे याबाबत लिखित तक्रार केली होती. मात्र जवळपास चार ते पाच महिने उलटून गेले, तरी देखील मनपाने याबाबत कोणताही गुन्हा सदर कृत्य करणाऱ्या आणि महापालिकेचे आणि पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर दाखल केलेला नाही.
मनपा प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ?
मनपा प्रशासनाला यातून ज्यांनी हा प्रकार केला त्यांना पाठीशी घालायचे आहे काय ?, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यांनी सदर महापालिकेच्या मालमत्तेची झालेली चोरीची घटना शाखा अभियंता मनोज पारखे, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या वारंवार निदर्शनास आणून देखील त्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाई केलेली नाही. जनतेच्या पैशातून उभे राहिलेले हे मंगल कार्यालय जर महापालिका सांभाळू शकत नसेल तर महापालिका नेमके करते काय ? ही कारवाई करण्याची टाळाटाळ करून मनपा प्रशासनाला नेमके कुणाला पाठीशी घालायचे आहे ? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिट केले होते का ?
शिंदेनी म्हटले आहे की, वास्तविक पाहता हे मंगल कार्यालय सुस्थितीत व टिकाऊ होते. ज्यांनी ते जमिनोदोस्त केले त्यांचा यामागे नेमका हेतू काय आहे ? ज्यांनी दोन जेसीबी लावून ते पाडून टाकले ते जेसीबी कोणी आणले होते ? जेसीबी कोणाचे होते ? जेसीबी चालक कोण होते ? त्याचा शोध घेण्याची गरज आहे. महापालिकेच्या पॅनलवरील आर्किटेक्ट कडून सदर मंगल कार्यालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते का ? महापालिकेने स्वतः ते पाडले नाही असं महापालिका सांगते. मग स्ट्रक्चरल ऑडिट नसताना आणि ते पाडण्याची आवश्यकता किंवा मनपाचे कोणते आदेश नसताना, ते पाडून देखील मनपा मुग गिळून गप्प का बसली आहे ? असा सवाल शिंदे यांनी केला आहे.
..अन्यथा मनपा आयुक्त दालनात उपोषणाचा इशारा
दहा दिवसांच्या सखोल चौकशी करत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता मनपा आयुक्तांच्या दालनात काँग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा दशरथ शिंदे यांनी दिला आहे.
0 Comments