वरिष्ठ नेते, पक्षाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेश काँग्रेसचे कडक निर्देश
प्रतिनिधी : जिल्हा व ब्लॉक स्तरावरील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक वेळा प्रसार माध्यमांसमोर वरिष्ठ नेत्यांच्या व पक्षाच्या विरोधात वक्तव्य करतात. स्थानिक पातळीवर निवडणुकांमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतात. तसेच बॅनर, पोस्टर बाबतही राजशिष्ठाचार पाळत नाहीत. या बाबी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर वेळीच पक्ष शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोलेंनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय शिस्तभंग समिती गठित करण्याचे लेखी निर्देश प्रदेश काँग्रेसच्या वतीने दिले आहेत. पक्षाच्या या कडक भूमिकेमुळे पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या अनेकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.
प्रदेशाध्यक्ष आ.पटोल, विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली समिती काम करणार आहे. समिती पुढील प्रमाणे असणार आहे. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असून पक्षाच्या आदेशानुसार अध्यक्ष किरण काळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. सदस्य म्हणून ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अनिस चुडीवाला, ओबीसी अध्यक्ष संजय झिंजे यांना स्थान देण्यात आले आहे. यासह शहर जिल्ह्याचे प्रभारी, सहप्रभारींचा मानद सदस्य म्हणून समावेश आहे.
प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे की, वरिष्ठ नेत्यांच्या व पक्षाच्या विरोधात वक्तव्य करणे या बाबी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर वेळीच योग्य ती कारवाई न झाल्यास पक्षाचे फार मोठे नुकसान होऊ शकते. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये याचा फटका बसतो. काँग्रेसच्या सर्व फ्रंटल, आघाड्या, सेल, विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्यास पक्ष आता कडक कारवाईचा बडगा उगारणार आहे. पक्षात राहून पक्षाचच नुकसान होईल अशा प्रकारे पक्षाच्या विरोधात कामे करणाऱ्यांची कृत्ये प्रांताध्यक्षांनी अतिशय गांभीर्याने घेतली असून याकरिता शिस्तभंग समिती गठीत करण्यात आली आहे.
समिती कडक कारवाई करणार शहर जिल्हास्तरीय शिस्तभंग समितीने आपल्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षीय कामकाज व पक्षवाढी विरोधात कोणतेही गैरवर्तन केल्यास त्यांना शिस्तभंग समितीच्या अध्यक्षांनी रीतसर नोटीस देऊन सात दिवसांच्या आत खुलासा मागवावा. खुलासा समाधानकारक नसल्यास समितीची तातडीने बैठक बोलावून सदर व्यक्तीच्या गैरवर्तनासंदर्भात कडक शिस्तभंग कारवाई बाबतचा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी प्रदेश कार्यालयास पाठविण्याच्या स्पष्ट सूचना प्रदेश काँग्रेसने शहरस्तरीय समितीला दिल्या आहेत.
0 Comments