राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कुठल्याही परिस्थितीत आघाडी नको, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंकडे मागणी
प्रतिनिधी : अहमदनगर मनपाची निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. जनतेच्या मनातील खरा विरोधी पक्ष म्हणून शहरात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करत आहे. मुकुंद नगरसह अल्पसंख्यांक बहुल भागांचा विकास योग्य नेतृत्वा अभावी रखडला आहे. हा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या भागातून मनपा निवडणुकीत आजवर कधीही न लढलेल्या नवोदित व तरुण चेहऱ्यांना काँग्रेसने संधी द्यावी, अशी मागणी अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडिवाला यांनी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने काळे यांच्याकडे केली आहे.
चुडीवाला म्हणाले की,
अल्पसंख्यांक भागातून काँग्रेसचे किमान आठ नगरसेवक मुस्लिम समाजातून निवडून येऊ शकतात. मात्र मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेल्या आघाडीमुळे काँग्रेसवर अन्याय झाला. लढण्याची पूर्ण संधीच मिळाली नाही. शहराच्या विद्यमान लोकप्रतिनिधींची भूमिका ही अल्पसंख्यांक समाजाला डावलणारी आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर कोणत्याही परिस्थितीत आघाडी करू नये.
चुडीवाला पुढे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजात अनेक आश्वासक तरुण चेहरे काम करत आहेत. त्यांचे संघटन चांगले आहे. अल्पसंख्यांक भागातून अशा नवोदित तरूण चेहऱ्यांना संधी द्यावी.
काही लोकांनी पक्षाच्या उमेदवारीवर विजय मिळवला. काही लोक पक्ष संघटनेत पदाधिकारी म्हणून मिरवतात. मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी धावून जात नाहीत. पक्ष वाढीसाठी कोणतेही काम करत नाहीत. बैठकांना, कार्यक्रमांना गैरहजर असतात. या उलट जाहीररित्या पक्षविरोधी भूमिका घेतात. अशां ऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी.
कर्नाटक विजय टर्निंग पॉईंट
कर्नाटक निवडणुकीतील झंजावती विजयाने जाती, धर्मातील द्वेष पसरविणाऱ्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली आहे. देशात सध्या काँग्रेसची लाट येताना दिसत आहे. कर्नाटक विजय हा संविधान वाचविण्याच्या लढाईतील महत्त्वाच्या टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या विजयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारल्याचे चुडीवाला यांनी म्हटले आहे.
बुधवारी मुंबईत बैठक
बुधवारी (दि.२४) प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाची राज्य कार्यकारणी व जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे. विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्य सरकारच्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ.वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात दुपारी १.०० वाजता ही बैठक पार पडणार असल्याची माहिती, चुडीवाला यांनी दिली आहे.
0 Comments