Subscribe Us

Header Ads

'भारत जोडो यात्रे'साठी बाळापूरकडे रवाना झालेल्या शहर काँग्रेसचे नितीन गडकरींना 'नगर शहर खड्डे दर्शन यात्रेचे' निमंत्रण

'भारत जोडो यात्रे'साठी बाळापूरकडे रवाना झालेल्या शहर काँग्रेसचे नितीन गडकरींना 'नगर शहर खड्डे दर्शन यात्रेचे' निमंत्रण

गडकरी साहेब, नगरकरांच्या यातना समजून घेण्यासाठी तुम्ही जरा दुचाकीवरून शहराची यात्रा कराच - किरण काळे

अ - नगर प्राईड वेबन्यूज टीम : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी नगर शहराच्या ऐतिहासिक मातीचा कलश घेऊन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज सकाळी बसेस, खाजगी वाहनातून अकोले तालुक्यातील बाळापुरकडे भारत जोडोचा जयघोष करत उत्साहात रवाना झाले. 

खड्डे आणि रस्ते या विषयावरून नगर पासून मुंबई पर्यंत मोर्चा, आंदोलने, उपोषण करत रान पेटवणाऱ्या काँग्रेसने मात्र जाताना उड्डाणपूल उद्घाटनासाठी नगर शहरात येणाऱ्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना 'नगर शहर खड्डे दर्शन यात्रेचे' जाहीर निमंत्रण दिले आहे.

चितळे रोडवरील किरण काळे यांच्या शिवनेरी कार्यालयापासून शहरातले कार्यकर्ते गुरूवारी सकाळीच यात्रेसाठी रवाना झाले. संध्याकाळी ते अकोल्याच्या बाळापूर या ठिकाणी पोहोचणार असून तेथेच मुक्काम करणार आहेत. शुक्रवारी सकाळी सहा वाजता कुपटा (जि. अकोला) येथून राहुल गांधींच्या पदयात्रेत शहरातील कार्यकर्ते सहभागी होणार असून दुपारी साडेचार वाजता शेगावच्या भव्य जाहीर सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती किरण काळे यांनी दिली आहे. 

सभेनंतर शेगावात मुक्काम करून शनिवारी सकाळी सहा वाजता राहुल गांधीं समवेत पुन्हा यात्रेत कार्यकर्ते पायी चालणार असून सायंकाळी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळपर्यंत यात्रेत सहभागी होणार आहेत. रविवारी शहरातील कार्यकर्ते परत नगर शहरात दाखल होणार आहेत. 

भारत जोडो यात्रेसाठी रवाना झालेल्या काँग्रेसने, नगरकरांच्या याताना समजून घेण्यासाठी गडकरी यांनी दुचाकीवरून शहराची यात्रा करावी असे जाहीर आवाहन काळे यांनी नगरकरांच्या वतीने केले आहे. या शहर खड्डे दर्शन यात्रेच्या दुचाकीचे सारथ्य उड्डाणपुलाचे श्रेय घेणाऱ्या शहराचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वतः करत गडकरींना शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आणि पडलेले हजारो, लाखो खड्डे दाखवावेत, असे काळे यांनी म्हटले आहे. 

उड्डाण पुलासाठी केंद्र सरकारने सुमारे २६० कोटी रुपये खर्च केले आहेत. एका उड्डाणपूलासाठी केलेल्या या खर्चा एवढीच रुपये २६० कोटींची रक्कम विशेष पॅकेज म्हणून नगर शहरातील अंतर्गत रस्ते पुढील ७० वर्षे टिकतील यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावेत, अशी जाहीर मागणी नगर दौऱ्यावर येणाऱ्या गडकरींकडे काळेंनी नगरकरांसाठी केली आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री या नात्याने दौरा मार्गावरील रस्ते चकाचक करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू झाले आहे. शहरातील ज्या रस्त्यांवरून मंत्री जाणार आहेत त्या रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. मात्र बुऱ्हाणनगर ते प्रोफेसर कॉलनी ते शिल्पा गार्डन ते पोलीस परेड ग्राउंड म्हणजे नगर शहर नाही. 

याव्यतिरिक्त खड्ड्यात हरवलेल्या शहराच्या अन्य मार्गांनी देखील देशाच्या रस्ते मंत्र्यांनी शहराची यात्रा करावी. म्हणजे शहराच्या सर्वच रस्त्यांचे आणि खड्ड्यांचेही भाग्य उजळेल, असे म्हणत काँग्रेसने गडकरी यांना शहर खड्डे दर्शन यात्रेसाठी पुढील प्रमाणे यात्रा मार्ग सुचविला आहे.

नितीन गडकरी यांच्यासाठी काँग्रेसने सुचविलेला खड्डे दर्शन यात्रा मार्ग 

नगर येथे हेलिपॅडवर आगमन ते नेत्यांच्या घरी भेटीगाठी ते भिंगार शहरातील अंतर्गत रस्ते ते सावेडी उपनगर येथे कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी ते नगर - मनमाड रोड मार्गे चैतन्य क्लासिक ते गांधीनगर ते गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिर ते बोल्हेगाव फाटा ते पोलीस कॉलनी ते आदेश लॉन्स ते सन lफार्मा कॉलेज ते बायपास मार्गे सावेडी गाव ते नगर - मनमाड रोड मार्गे सर्जेपुरा ते बेलदार गल्ली ते दाणे डबरा ते दाल मंडई ते तेली खुंट ते नेता सुभाष चौक ते चौपाटी कारंजा ते सांगळे गल्ली चौक ते पटवर्धन चौक ते लक्ष्मी कारंजा चौक ते महाजन गल्ली ते तखती दरवाजा चौक ते आशा टॉकीज चौक ते सबजेल चौक ते जुनी महानगरपालिका ते पाचपीर चावडी ते धरती चौक ते बुरुडगल्ली ते ख्रिस्त गल्ली ते जुना कापड बाजार रोड ते पिंजार गल्ली ते पारशा खुंट ते हातमपुरा ते अहमदनगर वस्तुसंग्रहालय ते कोठी ते सारसनगर प्रभागातील अंतर्गत रस्ते ते औसरकर मळा ते नक्षत्र लॉन्स ते चाणक्य चौक ते महात्मा फुले चौक ते सहकार सभागृह ते माळीवाडा वेस ते जुने एसटी स्टँड ते राजासाब वाईन्स ते आनंदऋषीजी हॉस्पिटल ते रेल्वे स्टेशन परिसरातील अंतर्गत रस्ते ते केडगाव उपनगरातील अंतर्गत रस्ते ते उड्डाणपूल उद्घाटन स्थळ. उद्घाटन कार्यक्रमानंतर मुकुंद नगर परिसरातील अंतर्गत रस्ते ते थेट कल्याण रोड दिल्ली गेट मार्गे कल्याण रोड परिसरातील अंतर्गत रस्ते. तिथून पुढे कल्याण रोड परिसरातील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उद्योगनगरी औरंगाबादकडे प्रस्थान.


Post a Comment

0 Comments