Subscribe Us

Header Ads

शहर सहकारी बँक निवडणूक बिनविरोध होण्यात अडथळे ? "या" समाजात डावल्यामुळे नाराजी...

 


शहर सहकारी बँक निवडणूक बिनविरोध होण्यात अडथळे ? "या" समाजात डावल्यामुळे नाराजी...

शहर सहकारी बँकेच्या पॅनलमध्ये अल्पसंख्यांक समाजाला डावल्यामुळे नाराजी, प्रतिनिधित्व देण्याची मागणी... 

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : शहर सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. येत्या शुक्रवारी 25 नोव्हेंबरला अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबत तर्क लावले जात असतानाच निवडणूक बिनविरोध होण्यात अडथळे निर्माण झाल्याचे दिसत आहे. सुभाष गुंदेचा, गिरीश घैसास यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त अन्य काही उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.अर्ज माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर आहे. मात्र तत्पूर्वीच अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाला बँकेच्या पॅनलमध्ये डावलल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त होत आहे.

अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने अनिस शकूर चुडीवाला यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने दाखल करणारे ते एक उमेदवार आहेत. चुडीवाला हे बाजारपेठेतील जुने आणि प्रतिष्ठित व्यापारी असून त्यांच्या कुटुंबाला व्यापाराची अनेक पिढ्यांची परंपरा आहे. अल्पसंख्यांक समाजासह त्यांचा सर्व समाजांच्या व्यापाऱ्यांमध्ये दांडगा जनसंपर्क असून ते अहमदनगर शहर काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते आहेत. बँकिंग क्षेत्राची त्यांना चांगली जाण आहे.

मुस्लीम समाजाच्या वतीने सुभाष गुंदेचा, गिरीश घैसास यांना मुस्लिम समाजाला संचालक मंडळामध्ये प्रतिनिधित्व देण्याच्या मागणीचे निवेदन समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहर सहकारी बँक ही अहमदनगर मधील अत्यंत जुनी आणि वैभवशाली बँक आहे. या बँकेत मुस्लिम समाजाचे खातेदार आहेत. त्याचबरोबर बँकेमध्ये आजवर मुस्लिम समाजाला अत्यंत तुरळकरीत्या प्रतिनिधित्व मिळाले आहे. ॲड.जी. जी. खान हे बँकेचे संस्थापक संचालक राहिलेले आहेत. बँकेच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. या व्यतिरिक्त आजवर केवळ प्रा. एम. ए. शेख आणि प्रा. एफ. एम. सय्यद या मुस्लिम समाजाच्या दोनच प्रतिनिधींना बँकेच्या संचालक मंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. 

यामुळे मुस्लिम समाजामध्ये शहर बँकेमध्ये स्थान दिले जात नसल्यामुळे नाराजीची भावना आहे. मुस्लिम समाजाला डावलले जात असल्यामुळे चुकीचा संदेश समाजात जात आहे. यावर्षीच्या निवडणुकीसाठी समाजाच्या वतीने अनिस शकूर चुडीवाला या आमच्या मुस्लिम समाजाच्या केवळ एका प्रतिनिधीने उमेदवारीसाठीचा अर्ज दाखल केलेला आहे. आमची तमाम अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या वतीने आपल्याकडे मागणी आहे की अनिस चुडीवाला यांना मुस्लिम समाजाच्या वतीने आपण या पंचवार्षिकसाठी संचालक मंडळामध्ये संचालक पदासाठी काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. 

संधी न दिल्यास निवडणूक लढवण्याचा इशारा

निवेदनात पुढे म्हटले आहे की, यामुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. मुस्लिम समाजात देखील सकारात्मक संदेश जात निर्माण झालेली नाराजी दूर होईल. मुस्लिम समाजाच्या या मागणीचा आपण सकारात्मक विचार कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. याबाबत विचार न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. 

अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या या भूमिकेमुळे शहर सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की नाही याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. आधीच तोट्यात असणाऱ्या शहर सहकारी बँकेला निवडणूक प्रक्रियेस सामोरे जावे लागल्यास मोठ्या खर्चाचा भुर्दंड पडू शकतो. बँकेचे नेते सुभाष गुंदेचा, गिरीश घैसास यांनी याबाबत सामंजस्याची भूमिका दाखवत एक जागा अल्पसंख्यांक समाजासाठी सोडल्यास निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा आहे. मात्र बिनविरोध होणार की निवडणूक लागणार हे पाहण्यासाठी येत्या शुक्रवार पर्यंत बँकेच्या सभासदांना वाट पहावी लागणार आहे. 

निवेदनावर अत्तहर सय्यद, मतीन उस्मान तांबोळी, सरफराज मोहम्मद, अली, मोहम्मद खान गफार, फिदा हुसेन, फारुख रंगरेज, इरफान सलीम रंगरेज, शाहिद हमीद तांबोळी, बागवान तनजील, शेख हमजा अली, अर्षद बागवान, फिरोज शेख,बबलू बागवान, अरमान इकबाल, इरफान खान, नुमान शेख, लियाकत मोहम्मद शफी शेख, आयान अश्फाक शेख आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments