Subscribe Us

Header Ads

भुईकोट किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज - किरण काळे

 


भुईकोट किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज - किरण काळे 

राहुल गांधींना सुपुर्द करणासाठीच्या कलशासाठी नगरच्या ऐतिहासिक माती संकलन अभियानाचा झाला शुभारंभ

अ - प्राईड वेबन्यूज टीम : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते भुईकोट किल्ल्यात बंदी होते. सुमारे सव्वा चारशेहून अधिक वर्षांचा या किल्ल्याचा इतिहास आहे. निजामशाहीच्या काळात उभ्या राहिलेल्या या किल्ल्यावर निजामांसह, मोगल, पेशवे, इंग्रजांनी त्या-त्या शतकात राज्य केले. सपाट भूपृष्ठावर उभारण्यात आलेला हा किल्ला जगातील एक आगळा- वेगळा आणि बांधकामाची उत्कृष्ट रचना असणारा किल्ला आहे. नगर शहराच्या मातीत हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. ही नगरसाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे भुईकोट किल्ल्याला युनेस्को तर्फे देण्यात येणारा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 


सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या देगलूर जवळील सीमा भागातून राज्यात दाखल झाली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते, कार्यकर्ते, विविध सामाजिक, समविचारी संघटना, नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. महाराष्ट्रात दाखल होतच खा.गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्यवृष्टी करत अभिवादन केले. महाराष्ट्रातील पहिल्या भाषणाची सुरुवात देखील गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत केली. सोमवारी नगर शहरात देखील या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली गांधी यांना नगरच्या ऐतिहासिक मातीच्या देण्यात येणाऱ्या कलशासाठी माती संकलन अभियानाचा शुभारंभ ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


काळे म्हणाले की, महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली होती. नंतरच्या काळात सबंध देश ढवळून निघाला. इंग्रजांची जुलमी राजवट उलथून लावत देशाला स्वातंत्र्य मिळाले. मुळात काँग्रेसची स्थापना आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसचे संपूर्ण उद्दिष्ट हे केवळ देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणे हेच होते. काँग्रेस व्यतिरिक्त देशात अन्य असा कोणताही पक्ष नव्हता की ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे. मात्र आज जाती - जाती, धर्म - धर्मात देशाला विभागणारे लोकच स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे भूतपूर्व नेते सहभागी असल्याचे सांगत असून धादांत खोट्या इतिहासाची मांडणी करताना पाहायला मिळत आहेत. ही सरळ सरळ लबाडी आहे. 


१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष, असफ अली, आचार्य जे. बी. कृपलानी, आचार्य नरेंद्र देव, पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्यासह काँग्रेसचे व स्वातंत्र्यलढ्याचे अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय नेते किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पं.नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे उपलब्ध आहेत. याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी ’हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला. युनेस्को जगभरातील विविध महत्त्वाच्या संस्कृती आणि पुरातन वास्तूंच्या जतनासाठी वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देऊन संवर्धनाचे काम करत असते. भुईकोट किल्ल्याचा देखील या जागतिक स्थळांच्या या महत्वपूर्ण यादीत समावेश झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी कळेंनी केली आहे. 


यावेळी माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, सावेडी उपनगर अध्यक्ष अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष पै.दीपक जपकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, माजी नगरसेविका जरीना पठाण, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष पुनम वनंम, अपंग महिला काँग्रेस विभागाच्या शहर समन्वयिका मोमीन सय्यद, महिला काँग्रेस पदाधिकारी अर्चना पाटोळे, मीना रणसूर, शैलाताई लांडे, ज्योती साठे, अपंग पुरुष काँग्रेस विभाग शहर समन्वयक सोफियान, ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी हनीफ मोहम्मद जहागीरदार, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, ज्ञानेश्वर शिरसाट, बापू डोंगरे, सचिन साठे, सौरभ भोसले, काँग्रेस सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष ऋतिक जाधव, विकास घोरपडे, उमेश साठे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, भरत पुंडे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments