Subscribe Us

Header Ads

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या इंजिनियर, विद्यार्थी, आंबेडकरी चळवळीतील युवकांनी घेतला काँग्रेसचा झेंडा हाती

 

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या इंजिनियर, विद्यार्थी, आंबेडकरी चळवळीतील युवकांनी घेतला काँग्रेसचा झेंडा हाती 

राहुल गांधींमुळे प्रभावित होत किरण काळेंच्या नेतृत्वाखाली केला जाहीर प्रवेश 

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम (औरंगाबाद) : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांवरून चर्चेचा विषय झाली. शेगावला झालेल्या सभेत विराट गर्दी पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकीय चळवळीत नसणाऱ्या शहरातील अनेकांनी देखील गांधी यांच्या समवेत या यात्रेत सहभागी होत सभेलाही उपस्थिती लावली. राहुल गांधींना पदयात्रेत प्रत्यक्ष पाहून आणि विराट सभेला संबोधित करतानाचे त्यांचे विचार ऐकून नगर शहरातील विद्यार्थी, इंजिनिअर आणि आंबेडकरी चळवळीतील युवकांनी गांधी यांच्या बेरोजगारी विरुद्धच्या त्यांनी पुकारलेल्या लढाईने प्रभावित होत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. 

घडले असे की, काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस पक्षाशी आणि राजकारणाशी काहीही एक संबंध असणाऱ्या अनेकांनी देखील काँग्रेस कार्यालयाशी संपर्क साधत आम्हालाही या पदयात्रेत राजकारण विरहित सहभागी व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. अशा अनेकांना देखील काळे यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी संधी दिली होती. 

बाळापुर फाट्यावर शहरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि शहरातील राजकारणाशी संबंधित नसणारे विद्यार्थी, युवक, नागरिक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. यात्रा मार्गावरील वातावरण अत्यंत उत्साहाचे होते. जागोजागी यात्रेचे स्वागत होत.हजारो लोक या यात्रेत चालत होते. यामध्ये तरुणाईची संख्या अधिक होती. सकाळच्या सत्रात गांधी यांच्या समवेत चालल्यानंतर दुपारचे जेवण शेगाव नगरीत शहरातील सर्वांनी भक्तनिवासात घेतले. 

यावेळी नगरमधील इंजिनिअर असणाऱ्या अनिल जाधव, एसवायबीसीएचा विद्यार्थी असणाऱ्या तुषार जाधव, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या किशोर कांबळे या युवकांच्या मनामध्ये राहुल गांधीं विषयी एक आपलेपणाची भावना निर्माण झाली. जेवणाच्या टेबलावरच त्यांची बेरोजगारीवर लढणाऱ्या, युवकांचा आवाज बनलेल्या गांधी यांच्या काँग्रेस पक्षात आपण प्रवेश करावा की काय, असा संवाद रंगू लागला. मात्र ते द्विधा मनस्थितीत होते.

संध्याकाळी गजानन महाराज मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या विस्तीर्ण मैदानावरील सभेत युवक काळे यांच्यासह सहभागी झाले. यावेळी अलोट गर्दी झाली होती. यात युवकांची संख्या मोठी होती. राहुल गांधी भाषणासाठी उठले आणि जोरदार आतिषबाजी झाली. लाखो लोकांनी एकच जल्लोष करत राहुल यांचे स्वागत केले. राहुल यांनी यावेळी जोरदार भाषण केले आणि तिथेच या युवकांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचा निश्चय मनात पक्का केला. 


शेगाव कडून नगरकडे परतीचा प्रवास सुरू झाला. पहाटेच्या सुमारास ज्या बसमध्ये हे युवक होते ती बस पंक्चर झाल्यामुळे एका ढाब्याजवळ थांबली. पंक्चर काढणारा उपलब्ध न झाल्यामुळे सकाळी उजाडल्यावर चाक बदलण्याचे काम सुरू झाले. यावेळी ढाब्यावरच सकाळच्या चहा, नाष्ट्याच्या निमित्ताने काळे यांच्याशी संवाद सुरू झाला. यावेळी मात्र न राहवलेल्या या युवकांनी काळे यांना आम्हाला पक्षात प्रवेश करायचा आहे. तुम्ही आम्हाला पक्षात घ्याल का, अशी विनंती केली.

काळे यांनी तात्काळ त्यांच्या विनंतीचे स्वागत करत, लगेच प्रवेश घेऊ असे म्हणत, त्यांना गळ्यात काँग्रेसचे पंचे घालत त्यांना नगर - औरंगाबाद रोडवरील प्रवरासंगम जवळील ढाब्यावरच पक्षप्रवेश दिला. काळे यावेळी म्हणाले की, रोजगार ही आज युवकां समोरील मोठी समस्या आहे. ती दूर करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्ये आहे. हा पक्ष सर्वसामान्यांचा, तरुणांचा, महिलांचा, गरिबांचा, सर्व जाती-धर्मांचा आहे. प्रवेश केलेल्या तरुणांनी पुढील काळात युवक, विद्यार्थ्यांसह समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काँग्रेसच्या माध्यमातून शहरात काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments