सुरज जाधव टोळीवर मोक्का लावण्याची काँग्रेसची एसपींकडे मागणी
पोलिसांचा वचक संपल्यामुळे राजकीय वरदहस्तातून दहशत सुरू असल्याचा काळेंचा आरोप, झिंजेंना पोलीस संरक्षण द्या
अहमदनगर प्राईड न्यूज वेब न्यूज टीम : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, हॉकर्स युनियनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणातील जामिनावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंड सूरज जाधव आणि टोळीने भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा हल्ला राष्ट्रवादीच्या आमदारांच्या समोर केला गेला आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. राष्ट्रवादीची शहरात गुंडगिरी वाढली आहे.
यांना कायद्याचे राज्य मान्य नाही. गुंड जाधव टोळीला तात्काळ अटक करून जाधव टोळीवर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे व दूरध्वनीद्वारे चर्चा करत केली आहे.
या निवेदनाची प्रत उचित कार्यवाहीसाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांना देखील पाठविली आहे. पोलीस महासंचालक यांनी काळे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत काळे यांच्या अर्जावर पुढील उचित कार्यवाही करण्याचे आदेश ईमेल द्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तातडीने दिले आहेत.
आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करू शकतो तर आम्ही काहीही करू शकतो या बळवलेल्या फाजिल आत्मविश्वासामुळे हे गुंड शहरात दिवसाढवळ्या भर रस्त्यांमध्ये धुडगूस घालत आहेत. हल्ले करत आहेत. सुरज जाधव आणि टोळीवर यापूर्वी लुटमार करणे, चोरी करणे, विनयभंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी अनेक वेळा तो जेलची वारी देखील अनेक वेळा करून आला आहे. पोलिसांचा वचक संपल्यामुळेच शहरात राजकीय वरदहस्तातून दिवसाढवळ्या दहशत सुरू असल्याचा किरण काळेंनी गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, झिंजे यांनी किरण काळेंची कॉग्रेसच्या चितळे रोड वरील शिवनेरी कार्यालयात समक्ष भेट घेत हकीकत सांगितली. काळे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
काळे म्हणाले की, झिंजे या भ्याड हल्ल्यातून बालमबाल बचावले. त्यांना गंभीर मुकामार लागला आहे. सुदैवाने यातून त्यांना जीवघेणी इजा झाली नाही. हल्लेखोरांनी शहराच्या आमदारांसमोर हा हल्ला करत असताना पुढल्यावेळी मारून टाकू अशी भर रस्त्यात धमकी देत दहशत केली आहे. पोलिसांना शहरातील राजकीय गुन्हेगार भीक घालायला तयार नाहीत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचे, संविधानाचे राज्य जर नगर शहरात अस्तित्वात असेल तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राजकीय गुन्हेगारांच्या तात्काळ मुसक्या आवळाव्यात अशी मागणी काळे यांनी काँग्रेसच्यावतीने केली आहे. झिंजे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला पाहता जाधव टोळीकडून त्यांच्या जीविताला धोका आहे.
यापूर्वी राजकीय वरदहस्तातून केडगाव हत्याकांड झाले आहे. तेही राजकीय गुन्हेगारांकडून झाले आहे. झिंजे हे सामाजिक कार्यात, गोरगरिबांच्या मदतीसाठी कायम अग्रेसर असतात. त्यांच्या जीवितला असणारा धोका लक्षात घेता, त्यांना पोलिसांनी तातडीने बंदुकधारी पोलिसाचे संरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
0 Comments