बोर्डाचे कार्यालय नगर शहरात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : महाराष्ट्र शासनाने विशेष कायदा करत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वक्फ बोर्डाची घटनात्मक स्थापना केली आहे. नगर शहरातील समाजाचे बोर्डाशी निगडित अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या माध्यमातून सोडविले जाणार आहेत. यासंदर्भात वक्फ बोर्डाचे चेअरमन आ. वजाहत मिर्झा यांची नुकतीच मुंबईत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या माध्यमातून भेट घेत सविस्तर चर्चा केल्याची माहिती अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी दिली आहे.
चुडीवाला यांनी यावेळी चेअरमन आ. मिर्झा यांचे नगर शहरातील या विभागाशी निगडित प्रश्नांबाबत चर्चा करत लक्ष वेधले. यावेळी चुडीवाला यांनी अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने आ. मिर्झा यांना नगर शहराचा दौरा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. आ. मिर्झा यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून लवकरच नगर दौरा करत ते तक्रारदारांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना चुडीवाला म्हणाले की, अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत, मालमत्तांची महसूलदस्तरी नोंद योग्य प्रकारे लागलेली नाही, आर्थिक व्यवहारा संदर्भातील तसेच ऑडिट बाबतचे प्रश्न, शहारातील वक्फ मालमत्तांच्या अनेक दाव्यांच्या सुनावण्या प्रलंबित आहेत. यामुळे समाजाच्या प्रतिनिधींना वारंवार खेटा माराव्या लागत आहेत. तरी कामे होत नाहीत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसच्या माध्यमातून काम करणार आहे.
बोर्डाचे कार्यालय नगर शहरात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
आज रोजी नगर शहर व जिल्ह्याची समाज बांधवांना वक्फ बोर्डाशी निगडित कामकाजासाठी औरंगाबाद तसेच मुंबईला जावे लागते. हे मोठे वेळ खाऊ आणि खर्चिक आहे. नगर शहरात असणाऱ्या वक्फशी निगडित मालमत्तांची संख्या मोठी आहे. दावे देखील अनेक आहेत. त्यामुळे समाजाची होणारी गैरसोय लक्षात घेता नगर शहरात बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याची मागणी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या माध्यमातून वक्फ बोर्डाकडे करणार असून काळे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे चुडीवाला यांनी म्हटले आहे.
0 Comments