अहमदनगर काँग्रेसचे शिष्टमंडळ आ.थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांची भेट घेणार... वेळप्रसंगी राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्याशी देखील बोलणार
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू आहेत. आ. बाळासाहेब थोरात आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या राजीनाम्याची बातमी आम्हाला व्यथित करणारी आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर काँग्रेसचे शिष्टमंडळ आ.थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माध्यमांना दिली आहे.
काळे म्हणाले की, सध्याच्या एकूण घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, डिझेल, पेट्रोल, गॅसचे सामान्य माणसाच्या अवाक्या बाहेर गेलेले दर यामुळे जनता हवालदिल आहे. राज्यातील शिक्षक, पदवीधर निवडणुकांचा निकाल हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी उत्साह वाढवणारा आहे. मात्र सध्याच्या पक्षांतर्गत राजकीय स्थितीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
या पार्श्वभूमीवर आ. थोरात यांची लवकरच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आम्ही भेट घेणार आहोत. प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांच्याशी देखील संवाद करणार आहोत. राज्याचे प्रभारी एच.के. पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १५ फेब्रुवारीला पक्षाच्या मुंबईतील टिळक भवन येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचे निमंत्रण जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना आले आहे. वेळप्रसंगी पाटील यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
आ.थोरात हे जिल्हा काँग्रेसचे तसेच राज्याचे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते काम करतात. काळे हे थोरात समर्थक म्हणून ओळखले जातात. थोरात प्रांताध्यक्ष असताना त्यांनीच काळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
पदवीधर निवडणुकी दरम्यान ग्रामीण जिल्हा काँग्रेस बरखास्त करण्यात आल्यानंतर प्रांताध्यक्ष पटोले यांनी काळे यांच्यावर ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाचाही पदभार सोपविला आहे. अहमदनगर काँग्रेसने आता थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे म्हटल्यामुळे याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments