अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : भाजप नेते माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी नगरमध्ये बोलताना चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. सध्या काँग्रेसच्या अंतर्गत कलहातून राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी चिमटे काढले. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार कॅबिनेट मंत्री ना. अतुल सावे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची उपस्थिती होती. यावेळी काळे हे नशीबवान आहेत असे वक्तव्य शिंदे यांनी केले.
काँग्रेस बंडखोर अपक्ष आ.सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जात जाहीर पाठिंबा देणाऱ्या तत्कालीन काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पक्षातून करण्यात आलेला हाकालपट्टीनंतर काळे यांच्यावर शहरासह ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्याचाच धागा पकडत शिंदे यांनी काँग्रेस मधील रंगलेल्या अंतर्गत कलगीतुऱ्याच्या अनुषंगाने केलेल्या शेरेबाजीमुळे उपस्थितांमध्ये यावेळी चांगलीच चर्चा रंगली.
सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल सहकारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे, शिवसेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, संचालक मनोज गुंदेचा, पतसंस्थेचे चेअरमन किरण शिंगी, व्हा. चेअरमन भांड, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी आदींसह संचालक उपस्थित होते.
शिंदे यावेळी म्हणाले की, किरण काळे काँग्रेसच्या मागच्या आणि आताच्या अशा दोन्ही प्रदेशाध्यक्षांच्या कार्यकाळातील सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे तुम्हाला कार्य करण्याचा अनुभव आला. पण तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला जिल्ह्या प्रभारीचाही कमी काळात चार्ज आला. सध्याची जिल्ह्याची आणि राज्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता अजून कुठे कुठे प्रभारी चार्ज येतो माहित नाही, असे शिंदे म्हणताच उपस्थितांमध्ये यावेळी जोरदार हशा पिकला.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे राजेंद्र चोपडा म्हणाले की, सावे सहकार मंत्री आहेत. त्यांचे अमित शहांशी चांगले संबंध आहेत. चुकीचे काम करणाऱ्या मागे ते ईडी लावतात. याचा धागा पकडत काळे म्हणाले की, ही पतसंस्था सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांच्या नावाने आणि विचाराने काम करते. रु. ८० कोटींच्या ठेवी असणाऱ्या पतसंस्थेचे लवकरच बँकेत रूपांतर होत अर्बन बँकेपेक्षाही मोठया रकमेच्या ठेवी होवोत, अशा मी शुभेच्छा देतो. मात्र सहकार मंत्र्यांना विश्वासही देतो की सुवालालजींच्या विचारावर काम करणाऱ्या या पतसंस्थेच्या कोणत्याही संचालकाच्या मागे ईडी लावण्याची संधी तुम्हाला भविष्यात कधी मिळणार नाही. आ.शिंदे यांनी देखील यावर टिप्पणी करत इथे कधी ईडी मागे लागणार नाही असे म्हणत संचालकांवर विश्वास दाखवला.
Video
0 Comments