काँग्रेस प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांची भेट
अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी अनिस चुडीवालांची वर्णी
संगमनेर : सुमारे पावणे दोन महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात सोमवारी दुपारी संगमनेर येथे आले. आज मंगळवारी सकाळी काँग्रेस प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आ.थोरात यांची भेट घेत शहर व जिल्ह्यातील राजकीय घडामोडींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीचे पत्र अनिस चुडीवाला यांना थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, नगर तालुका काँग्रेसचे ॲड. अक्षय कुलट, जिल्हा खजिनदार मोहन वाखुरे, उपाध्यक्ष अशोक शिंदे, सरचिटणीस स्वप्निल पाठक आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर झालेल्या या बैठकीत राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.
काळे म्हणाले की, जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध आणि मजबूत आहे. कुणी कितीही हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड आगामी काळात देखील सुरू राहील. पक्ष संघटन अधिक मजबूत केले जाईल. निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल. कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये. खांद्याला खांदा लावून पक्ष विस्ताराचे काम करावे. आ थोरात यांची तब्येत आता चांगली असून ते उद्याच्या मुंबईच्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत देखील सहभागी होणार आहेत. जिल्हाध्यक्ष काळे हे देखील त्यांच्या समवेत बैठकीत सहभागी होणार आहेत.
अल्पसंख्यांक काँग्रेसला नवे नेतृत्व
शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी अनिस चुडीवाला यांची अल्पसंख्यांक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी यांच्या मान्यतेने वक्फ बोर्डाचे चेअरमन तथा अल्पसंख्यांक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा यांनी नियुक्ती मुंबईतून जाहीर केली आहे. आ.थोरात यांच्या मान्यतेने, काळे यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर दीप चव्हाण समर्थक अजूभाई शेख हे कार्यरत होते. मात्र आता त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली असून काळे समर्थक चुडीवाला यांची या पदी वर्णी लागली आहे.
जिल्हा काँग्रेसची लवकरच बैठक
आ. थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बोलताना काळे यांनी जिल्हा काँग्रेसची लवकरच बैठक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेश काँग्रेसने देण्यात आलेल्या हाथ से हाथ जोडो अभियान, त्याचबरोबर संघटनात्मक कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
0 Comments