कसबा पोटनिवडणुक विजयाचा शहर काँग्रेसने गुलाल उधळत साजरा केला आनंदोत्सव
कसब्यात विजय, युवकांचे नगरमध्ये पक्ष प्रवेश
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढलेल्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालयासमोर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला आहे. अशाच विजयाची पुनरावृत्ती आगामी काळात नगर शहरात देखील जनतेच्या आशीर्वादाने काँग्रेस करून दाखवेल असा विश्वास या विजयानंतर बोलताना काळे यांनी व्यक्त केला आहे.
कसब्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपवर अनेक आरोप, प्रत्यारोप झाले. भाजपचे अनेक मंत्री कसबा मतदारसंघात मागील आठ दिवसांपासून तळ ठोकून होते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी प्रचाराचे मैदान तापवले होते.
मात्र मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला आपल्या पसंतीचा कौल दिला असून यामुळे काँग्रेससाठी हा उत्साह वाढवणारा विजय ठरत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. धंगेकरांच्या विजयामुळे त्याला खिंडार पडले आहे.
काळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काँग्रेसची लाट निर्माण होते आहे. कसब्यातील काँग्रेसचा विजय हा या देशातील बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ, जातीयवाद या विरोधातील विजय आहे. या निवडणुकीत प्रचंड पैशांचा पाऊस पाडला गेला. मतदार नको म्हणत असताना देखील बळजबरीने लोकांच्या घरात भाजपने पैसे, निवडणुकीच्या स्लिपा टाकल्या. दहशत केली गेली.
मात्र मतदारांनी पैसे आणि दहशतीला झुगारून लावलं. आगामी काळात नगर शहरातील मतदार देखील अशाच पद्धतीने काँग्रेसला कौल देत विकासात्मक काम करायची संधी देतील असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला. शहर जिल्हा काँग्रेसने या काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे अभिनंदन केले आहे.
कसब्यात विजय, युवकांचे नगरमध्ये पक्ष प्रवेश
कसबा विजयाचा आनंदोत्सव एका बाजूला नगर शहरामध्ये साजरा केला जात असताना अजय शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहर काँग्रेसमध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला आहे. शेळके म्हणाले की, देशाला काँग्रेसची गरज आहे. मी स्वतः युवक आहे युवकांमध्ये सध्याच्या एकूण व्यवस्थेबद्दल तीव्र संतापाची भावना आहे. नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. एमआयडीसी संपुष्टात आली आहे. किरण काळे यांच्याकडे शहर विकासाचे व्हिजन आहे. ते या शहराचे रूप पालटू शकतात, हा विश्वास वाटल्यामुळेच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिल चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, माजी नगरसेवक फैयाज केबलवाला, विद्यार्थी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष पूनमताई वनंम, मनपा माजी सहाय्यक लेखाधिकारी हाफिज सय्यद, शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. अजित वाडेकर, नदीम शेख, सफाई कामगार काँग्रेस विभागाचे शहर संघटक प्रशांत जाधव, शहर महासचिव इमरान बागवान, शहर सचिव गणेश आपरे, शहर सहसचिव शंकर आव्हाड, ब्लॉक काँग्रेस सचिव हनीफ मोहम्मद जहागीरदार, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, शुभम शेळके आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments