Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : किरण काळे यांची मोठी राजकिय खेळी.. अखेर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मुंबईत काँग्रेसमध्ये केला प्रवेश


अनेक बडे चेहरे काँग्रेसच्या वाटेवर - काळेंचा दावा.. झिंजेंवर ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची सोपवली जबाबदारी 

मुंबई : शहरात काही मंडळींनी किरण काळे हटावचा नारा दिला असताना काळे यांनी मात्र काँग्रेस बढावची मोठी खेळी केली आहे. पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीतून बड्या ज्येष्ठ नेत्याचा प्रवेश काळे यांनी घडवून आणला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी मुंबईत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेसचा झेंडा स्वीकारत पक्षप्रवेश केला आहे. राष्ट्रवादीला शहरात हा मोठा धक्का मानला जात आहे. आ. संग्राम जगताप, माजी आ. अरुण जगताप यांना या निमित्ताने काळे यांनी मोठा राजकीय शह दिल्याचे पाहायला मिळत आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजे यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हातून काँग्रेसचा झेंडा स्वीकारत मुंबईत पक्ष प्रवेश केला

झिंजे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने व ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसने या घटकांची मोट बांधण्यासाठी कंबर कसली असून त्यांना एकत्रित करण्यासाठी झिंजेंना ओबीसी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. 

तसे नियुक्तीपत्र ओबीसी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते पक्षाच्या मुंबईतील गांधी भवन येथील कार्यालयात देण्यात आले आहे. यावेळी काळे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे, राष्ट्रीय सहसमन्वयक मंगलताई भुजबळ, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला उपस्थित होते. 

झिंजे हे अहमदनगर हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सुमारे अडीच हजारहून अधिक या संघटनेचे शहरात सभासद आहेत. त्यांचा शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वत्र दांडगा जनसंपर्क आहे. आ. जगताप यांनी २०१४ ची निवडणूक जिंकण्यासाठी आपले जनसंपर्क कार्यालय चितळे रोड येथे सुरू केले होते. यावेळी झिंजेंनी आ. जगतापांना कार्यालयासाठी त्यांची वैयक्तिक जागा देऊन बळ देण्याचे काम केले होते. मात्र आता त्या कार्यालयाला कुलूप लागले आहे. त्यातच झिंजे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे या भागात काँग्रेसची ताकद वाढली आहे. 

प्रवेशानंतर मुंबईतून प्रतिक्रिया व्यक्त करताना झिंजे म्हणाले की, काँग्रेस हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. आमदार थोरात, काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये पक्षाचे सुरू असणारे काम चांगले वाटले. म्हणूनच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ओबीसीसह सर्व समाज घटकांना आगामी काळात काँग्रेशी जोडण्यासाठी मी काम करणार आहे. 

अनेक बडे चेहरे काँग्रेसच्या वाटेवर -

आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात कोणत्याही परिस्थितीत मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे काम केले जाईल. नवीन व सक्षम चेहऱ्यांना मनपाच्या उमेदवाऱ्या दिल्या जातील. राष्ट्रवादीसह अन्य पक्षांमधील अनेक बडे चेहरे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. योग्य वेळी त्यांचाही पक्षप्रवेश झालेला नगरकरांना पाहायला मिळेल, असा दावा किरण काळे यांनी मुंबईतून बोलताना केला आहे. 

Post a Comment

0 Comments