शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोडांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बजेटमध्ये भरीव तरतुदीची काँग्रेसच्या वतीने किरण काळेंची मागणी
प्रतिनिधी : शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा जुन्या मनपा कार्यालय आवारात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मनापाच्या अंदाजपत्रकीय महासभेत भरीव निधीची तरतूद करावी. तसेच सदर ईमारतीची डागडुजी, रंगरंगोटी करुन "स्व. अनिलभैय्या राठोड भवन" नामकरण करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महापौर रोहिणीताई शेंडगे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे पत्र काँग्रेसने राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनाही धाडले आहे.
काँग्रेसच्या वतीने पाठविलेल्या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या माध्यमातून स्व. अनिलभैय्या राठोड यांनी हयात भर जनतेची सेवा केली. ते गोरगरिबांचे आधारवड होते. सामान्य माणूस देखील त्यांच्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकत होता. मात्र कोरोना काळात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ही मनाला चटका लावणारी घटना होती. त्यांचे कार्य अहमदनगरकरांच्या स्मृतीमध्ये चिरंतन आहे.
त्यांच्या स्मृती येणाऱ्या पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहेत. संभाजी कदम यांनी प्रमुख सत्ताधारी शिवसेनेचे शहरप्रमुख या नात्याने पुढाकार घ्यावा. शहराचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगतापांनी यासाठी मनपा पदाधिकारी, प्रशासनाला महासभेपूर्वी लेखी पत्र देत सूचना कराव्यात, असे काळेंनी म्हटले आहे.
काळे म्हणाले की, स्व. अनिलभैय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सन २०१८ च्या सार्वत्रिक मनपा निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक नगरकरांनी शिवसेनेचे निवडून दिले होते. योगायोगाने आज रोजी मनपामध्ये महापौर, स्थायी समिती सभापती पद यासारख्या महत्त्वाच्या पदांवर शिवसैनिक विराजमान आहेत. त्यांच्या नेतृत्वात मिळालेल्या दैदिप्यमान यशामुळे शिवसेना उमेदवारांना नगरकरांच्या सेवेची संधी मिळाली आहे. सदर निर्णयांना तात्काळ मंजुरी देणे ही स्व.अनिलभैय्या यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
दरम्यान, सध्या मनपात सत्तेच्या पदावर शिवसेना, राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. सत्तेची सूत्र ही राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हातीk आहेत. मागणीचा सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने विचार केल्यास ही मागणी तात्काळ मार्गी लागू शकते. काळेंनी काँग्रेसच्या वतीने केलेल्या मागणी बाबत शिवसेना, राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी दोन्ही मागण्यांना एकमताने पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन काळेंनी केले आहे.
0 Comments