आ. थोरात यांची पतसंस्थेस सदिच्छा भेट
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता महत्वाची असते. योग्य शिस्त असेल तरच कारभार चालतो. सहकारमहर्षी स्व. सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचा मागील २२ वर्षांचा प्रवास ठेवीदार, कर्जदारांसाठी मोठं बळ देणारा आहे. स्व. गुंदेचांनी बँकिंगच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजकांना पायावर उभं करण्याचं काम केलं, असं प्रतिपादन माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
नगर शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूस सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. मागील महिन्यात या वास्तूचे लोकार्पण सहकार मंत्री ना. अतुल सावे, माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले होते. यावेळी तब्येतीच्या कारणास्तव आ.थोरात उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे शहरात आले असता त्यांनी सदिच्छा भेट देत यावेळी नूतन विस्तारित इमारतीची पाहणी करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ.लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक मनोज गुंदेचा, चेअरमन किरण शिंगी, व्हाईस चेअरमन विनय भांड, संचालक शांतीलाल गुगळे, सीए विशाल गांधी, सीए संकेत पोखरणा, प्रमोद डागा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, जैन धर्मशाळेचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, शंकर आव्हाड, प्रशांत जाधव, आकाश आल्हाट आदींसह पतसंस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
आ. थोरात म्हणाले की, स्व. सुवालालजींनी सेवा म्हणून बँकिंग क्षेत्रात काम केलं. ठेविदारांचा पैसा हा आपला पैसा असून त्याच्या रक्षणाची आपली जबाबदारी आहे या भावनेतून काम केलं. आज सहकारी क्षेत्रातील अनेक बँकांची दुरावस्था काय आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या नावाने असणारी ही पतसंस्था मात्र याला अपवाद आहे. मनोज गुंदेचा त्यांचा वारसा समर्थपणे चालवत असून त्यांनी देखील कामकाजात पाळलेल्या पारदर्शकता, शिस्तीमुळे सभासदांचा पतसंस्थेवर मोठा विश्वास असून त्यामुळेच मोठ्या रकमेच्या ठेवी आज पतसंस्थेकडे आहेत.
यावेळी मनोज गुंदेचा यांनी नवीन ईमारतीची माहिती आ. थोरात यांना दिली. ते म्हणाले की, स्व. सुवालालजी आणि आ.थोरात यांच्यात दृढ व्यक्तिगत ऋणानुबंध होता. त्यामुळे नेहमी गुंदेचा परिवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे काम त्यांनी केले आहे. पतसंस्थेच्या सभासदांचा विश्वास कायम टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी असून याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही. यावेळी नूतन वास्तूचे कौतुक आ.थोरात यांनी केले.
0 Comments