Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : नगर शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी आमने-सामने... छत्रपती संभाजी महाराज आयटी पार्कसाठी किरण काळेंची लाक्षणिक उपोषणाची घोषणा

शहर विकासासाठी काँग्रेस आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार 

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : अहमदनगर हे पेन्शनर्सचे शहर होत आहे. एमआयडीसी, बाजारपेठेची वाताहत, रोजगाराच्या अभावामुळे हजारो तरुण विकसीत शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उभारणी बरोबरच प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या विचारांची जपणूक केली पाहिजे. म्हणूनच भरघोस निधी देत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने एमआयडीसीमध्ये आयटी पार्कसह थोर महापुरुषांच्या नावाने विविध प्रकल्प उभारून शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, उद्योग, व्यापाराला चालना देण्याच्या मागणीकडे शहराचे आमदार, दक्षिणेचे खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्यावतीने एमआयडीसी कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केली आहे. 

सध्या प्रोफेसर चौकात छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. मागणी करणाऱ्या समितीमध्ये जवळपास सर्वच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यातच काँग्रेसने महाराजांच्या नावाने आयटी पार्क उभारण्यासाठी उपोषणाची घोषणा केल्याने मागण्या भिन्न असल्या तरी यानिमित्ताने दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याचे दिसत आहे. काळे म्हणाले की, महापुरुषांबद्दल काँग्रेससह सर्वांनाच प्रचंड आदर आहे. शहरात आधीपासूनच अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र या पुतळ्यांची, परिसरांची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही. मनपाने लक्ष देत पुतळ्यांची विटंबना तात्काळ थांबवावी.

महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर सगळ्यांनीच तत्कालीन समाजामध्ये सुधारणेसाठी, समाज उन्नतीसाठी काम केलं. पुढील पिढ्यांनी आमचे पुतळे उभारावेत असे यापैकी कोणत्याही महापुरुषांनी सांगितले नव्हते. आपण मात्र केवळ पुतळे उभारले. एकविसावे शतक सुरू आहे. तंत्रज्ञानाचे युग आहे. महापुरुषांच्या प्रेरणेतून त्यांच्या नावाने समाजाला पुढे नेऊ शकणारे उपक्रम राबविणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना मानवंदना ठरेल. 

 
गुंडगिरीमुक्त शहराबरोबरच सर्व सोयी, सुविधायुक्त व शहर सोडून अन्यत्र स्थलांतर करण्यापासून तरुणाईला परावृत्त करण्यासाठी विकसित शहर उभारणी हे काँग्रेसचे ध्येय आहे. यासाठी नगरकरांच्या वतीने काँग्रेस गुरुवार (दि.४ मे) रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती, काळेंनी दिली आहे.  

महापुरुषांच्या नावाने पुढील मागण्यांसाठी असेल काँग्रेसचे उपोषण : 

काळे म्हणाले की, 

  • तरुणांच्या रोजगारासाठी छ. संभाजी महाराज आयटी पार्क,
  • उद्योग विकासासाठी छ. शिवाजी महाराज एमआयडीसी सक्षमीकरण विशेष प्रकल्प, 
  • पुण्याच्या ससूनच्या धर्तीवर मनपाच्यावतीने सर्व सोयी सुविधांनी युक्त असे मध्यवर्ती ठिकाणी भव्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, 
  • महात्मा ज्योतिबा - सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन अकादमी, 
  • महिलांसाठी अहिल्याबाई होळकर स्वयंरोजगार प्रकल्प, 
  • मौलाना आझाद अल्पसंख्यांक रोजगार प्रशिक्षण केंद्र, 
  • बाजारपेठेसाठी प्रभू श्रीरामचंद्र व्यापारवृद्धी अभियान 

असे शहराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प मनपा व सरकारच्या वतीने सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण असेल, अशी माहिती काळेंनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments