शहर अल्पसंख्याक विभागाची लवकरच होणार बैठक, प्रवेशासाठी अनेक इच्छुक - अनिस चुडीवाला
मुंबई : अहमदनगर शहरात मोठ्या संख्येने दर्गा, मस्जिद, ट्रस्ट आहेत. त्यांच्या मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत येतात. या विषयाशी निगडित प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने लवकरच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन तथा काँग्रेस नेते आ. वजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीमध्ये नगरमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी दिली आहे.
नुकतीच प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाची बैठक पक्षाच्या मुंबई येथील टिळक भवन कार्यालयात पार पडली. बैठकीस मिर्झा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी अहमद खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहरातील अल्पसंख्यांक विभागाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा चुडीवाला यांनी वरिष्ठान समोर मांडला. बैठकीनंतर आ. मिर्झा यांच्याशी स्वतंत्र चर्चा करत नगरमध्ये जनता दरबार आयोजित करण्यासंदर्भात चर्चा केली तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यासाठी निवेदन दिले. यावर मिर्झा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ते नगर शहराच्या दौऱ्यावर येणार असल्याचे चुडीवाला यांनी म्हटले आहे.
चुडीवाला म्हणाले की, आगामी मनपाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक समाजाला जास्तीत जास्त संधी मिळावी या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. आ.बाळासाहेब थोरात, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मनपा निवडणूक ताकदीने लढवणार आहे. अनेक नवोदित चेहरे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. थोरात, काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम उमेदवार देत येत्या निवडणुकीत अल्पसंख्यांक बहुल भागातून शतप्रतिशत काँग्रेसचा झेंडा मनपावर रोवण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. नवोदित चेहऱ्यांना पुढे आणले जाणार आहे.
लवकरच इच्छुकांचे पक्षप्रवेश आणि बैठक
शहर अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाची किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. यावेळी आगामी मनपाच्या रणनीतीच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे. अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या संदर्भात बैठका सुरू आहेत. त्यांना काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश दिला जाणार असून संघटनेत स्थान दिले जाणार आहे. कार्यकर्त्यांचे हात बळकट करत अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविले जाणार असल्याची माहिती चुडीवाला यांनी दिली आहे.
0 Comments