Subscribe Us

Header Ads

उद्योग जगत : काँग्रेस औद्योगिक व व्यापार सेलच्या माध्यमातून नगरच्या महिला व युवा उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट - आनंद कुलकर्णीनगर शहराला "औद्योगिक नगरी" बनविण्याच्या किरण काळेंच्या व्हिजनला पक्ष बळ देईल

प्रतिनिधी : भारताची लोकसंख्या जगात मोठी आहे. चीनही मागे राहिलेला नाही. दोन्ही देशांनी मिळून जगातील सुमारे ४० टक्के बाजारपेठ व्यापली आहे. जगभरातील विक्रेते या व्यवसायिक संधीचा लाभ घेत आहेत. मात्र भारतीय उद्योजक स्वदेशी उत्पादन करण्यात स्वतः कमी पडत आहेत. काँग्रेस पक्षाच्या औद्योगिक व व्यापार सेलच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील महिला व युवा उद्योजक घडवत त्यांना उत्पादक म्हणून पुढे आणण्यापासून ते मार्केटिंग पर्यंतचे मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येणार आहे. या माध्यमातून नगर शहराला औद्योगिक नगरी बनविण्याच्या काळेंच्या स्वप्नाला काँग्रेस पक्ष प्रदेश स्तरावरून बळ देईल, असे प्रतिपादन सेलचे प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ उद्योजक आनंद कुलकर्णी यांनी केले आहे. 

शहर जिल्हा काँग्रेसच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. प्रदेश औद्योगिक, व्यापार सेलच्या पुढाकारातून महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या महिला व युवा उद्योजकांच्या प्रकल्पातून तयार झालेल्या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून बाजारामध्ये लॉन्च करण्यात आलेल्या कापडी पिशव्यांच्या प्रकल्पाची माहिती यावेळी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना दिली. याच धर्तीवर किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात देखील गृह उद्योगाचे छोटे, छोटे प्रकल्प उभारणार असल्याची माहिती औद्योगिक व व्यापार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख शेठ संचेती यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक व व्यापार सेनेच्या पुढाकारातून महिला व युवा उद्योजकांच्या प्रकल्पातून निर्मिती करण्यात आलेल्या कापडी पिशव्यांचे डेमोस्ट्रेशन करताना विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा उद्योजक आनंद कुलकर्णी व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुखशेठ संचेती, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, विकास भिंगारदिवे आदी. 

आनंद कुलकर्णी म्हणाले की, 

शहरामध्ये एमआयडीसीचा विस्तार मर्यादित प्रमाणात आहे. यामुळे महिलांसाठी गृह उद्योग ही रोजगारासाठीची मोठी संधी ठरू शकते. युवाशक्तीला रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीच्या मार्गदर्शनातून सक्षम उद्योजक बनविल्यास शहरासह देश व जगातील बाजारपेठेत तो आपले उत्पादन पोहोचवू शकतो. काँग्रेसच्या औद्योगिक व्यापार विभागाने यासाठी दूरदृष्टीचे व्हीजन ठेवून रोड मॅप तयार केला आहे. यामध्ये नगर शहराचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्या अंतर्गत शहरातील महिला आणि युवा उद्योजकांना घडविण्याचे काम केले जाणार आहे. 

किरण काळे म्हणाले की, 

नगर शहराला औद्योगिक शहर म्हणून घडविणे हे शहर जिल्हा काँग्रेसचे स्वप्न आहे. त्याशिवाय इथल्या उद्योग, व्यापाराला चालना मिळणार नाही. नगरकरांची क्रयशक्ती आणि दरडोई उत्पन्न वाढ होणार नाही असे माझे मत आहे. त्यामुळे या माध्यमातून शहरातील प्रत्यक्ष व्यापार, उद्योगांमध्ये काम करणारे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या क्षेत्रातील अनुभवी तज्ञ लोकांना बरोबर घेत आपल्या व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शहराच्या या दोन महत्वपूर्ण घटकांना बळ देण्यासाठी राज्यातील अनुभवी उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील, असा मला विश्वास आहे. 

मनसुख शेठ संचेती म्हणाले की, 

पक्षाने नुकतीच माझ्यावर या विभागाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याचे नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात उद्योगाला चालना देण्याचे काम आम्ही करणार आहोत. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागाचा सतत पुढाकार असणार आहे. लवकरच विभागाची कार्यकारणी गठीत केली जाणार असल्याचे यावेळी संचेती म्हणाले. 

यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा व्यापारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, उद्योजक इंजि. अभिनय सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments