"ते" म्हणतात, "ही" तर 'बंटी - बबली' ची जोडी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे चौकशीची मागणी
प्रतिनिधी : अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावर पहिल्याच पावसानंतर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून ठेकेदाराने घाईघाईने सुमारे पंचवीसहुन अधिक ठिकाणी रात्रीतून डागडूजी केली आहे. पुलावरील नाल्या तुंबल्या असून पाणी साचले आहे. पिलरच्या जोड कामाच्या ठिकाणी मोठी फट पडली आहे. या निकृष्ट कामाची काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी कार्यकर्त्यांसह पाहणी करत पोलखोल केली आहे. सदोष कामामुळे उड्डाणपूल हा मृत्यू पूल झाला आहे. या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आहे. असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींना निवेदन पाठवून निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी काळेंनी केली आहे. निवेदनाची प्रत खा.सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगतापांना देखील पाठवण्यात आली आहे.
पाहणी वेळी शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, विद्यार्थी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश गायकवाड आदी उपस्थित होते. या निकृष्ट कामाचे फोटो काँग्रेसने मंत्री गडकरींना पाठवले आहेत. निकृष्ट कामावरून संतप्त झालेल्या काळेंनी गंभीर आरोप केले आहेत.
किरण काळे म्हणाले, १६ - १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अनेक अडथळे पार करत हे काम झाले होते. सुमारे ३.५ किमी लांबी, १९ मीटर रुंदी असणाऱ्या चार पदरी उड्डाणपुलासाठी जनतेचे सुमारे ₹ ३३१ कोटी सरकारने खर्च केले आहेत. १९ नोव्हेंबरला लाखो रुपयांचा खर्च करत मोठा गाजावाजा करून राजकीय इव्हेंट करत गडकरींच्या हस्ते भाजप, राष्ट्रवादीने लोकार्पण केले.
बहुचर्चित उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाची पाहणी करताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, किशोर कांबळे, आकाश गायकवाड आदी.
मात्र लोकार्पणानंतर पहिल्याच पावसात अवघ्या सहा महिन्यात निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ठेकेदाराने घाईघाईने सुमारे २५ हून अधिक ठिकाणी थातूरमातूर डागडुजीचे काम केले आहे. अनेक ठिकाणी सुमारे २० ते ५० मीटर एवढे मोठे पॅचवर्क केले आहे. हे गंभीर व धक्कादायक आहे. नेत्यांनी यात टक्केवारी खाल्ली असून ठेकेदार, अधिकाऱ्यांशी संगनमत करत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं काळे यांनी म्हटल आहे.
पुल उखडल्यामुळे पॅच वर्क करत जागोजागी डागडूजी करण्यात आली आहे. यामुळे अनेक ठिकाणी अर्ध्या भागातील स्पीडब्रेकर, पांढरे - पिवळे पट्टे, रिफ्लेक्टर गायब झाले आहेत.
खासदार, आमदारांच्या जोडीवर टीकास्त्र
किरण काळे म्हणाले, दक्षिणेचे भाजपचे खासदार व शहराचे राष्ट्रवादीचे आमदार या जोडीने याच पुलावर अनेक वेळा फोटोसेशन केले. त्यांच्याच सखोल मार्गदर्शनाखाली या पुलाचे काम विक्रमी वेळात पूर्ण करण्यात आले. दोघांनी काम सुरू असताना अनेक वेळा भेटी देत पाहणी केली होती. या जोडीने नेमके काय दर्जाचे काम करून घेतले आहे याची पोलखोल काँग्रेसने आता नगरकरांसमोर केली आहे. भाजप, राष्ट्रवादीचा हा भ्रष्टाचार असून ही जनहिताचे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची जोडी नसून बंटी - बबलीची जोडी आहे. उद्घाटना वेळी या जोडीचे गडकरींनी जरी जाहीर कौतुक केले असले तरी राजकिय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांकडून ज्याला मराठीत लफडं म्हणतात, अशांकडून नगर शहरवासीयांनी चांगल्या कामाची अपेक्षा करणे हेच मुळात मोठा भ्रमनिरास करणारे असल्याचे काळेंनी म्हटले आहे. निकृष्ट कामामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत देखील या जोडीने आता येऊन फोटोसेशन करावे, असा खोचक टोला काँग्रेसने लगावला आहे.
उड्डाणपुलाचे काम सदोष
काळे यांनी पुलाच्या कामातील अनेक गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. पुलावर आत्तापर्यंत छोटे, मोठे अनेक अपघात झाले आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत. तीन ते चार जणांनी आपले प्राण गमावले आहेत. नाल्या तुंबल्यामुळे पाणी साचले आहे. चांदणी चौकाच्या जवळ असणारे वळण हा मृत्यूचा पॉईंट झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या पिलरचा जोड निखळला असून तो तातडीने दुरुस्त न केल्यास नजीकच्या काळात मुंबईत यापूर्वी घडलेल्या दुर्घटनेप्रमाणे पूल कोसळण्याची दाट शक्यता आहे.
उड्डाण पुलावरील नाल्या तुंबल्यामुळे पावसाचे पाणी साचले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या पिलरवरील जोड कामाच्या ठिकाणी मोठी फट पडली आहे.
पुलाच्या खाली वैयक्तिक व्यावसायिक फायद्यासाठी शहर लोकप्रतिनिधींच्या मालकीचे असणारे खाजगी हॉस्पिटल व हॉटेलच्या समोर केंद्र सरकारच्या इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक सूचनांना डावलून अपघाताला निमंत्रण देत डिव्हायडर टाकण्यात आलेले नाहीत.
अशा पद्धतीने करण्यात आलेल्या सदोष कामामुळे उड्डाण पुलावरून व खालून प्रवास करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याच्या गंभीर बाबीकडे किरण काळे यांनी मंत्री गडकरींचे लक्ष वेधले आहे.
स्थानिक नगरकरांना बाबाजी का ठुल्लू
अनेक वेळा उड्डाणपुलावर ट्राफिक जाम होत आहे. तासंतास गाड्यांच्या रांगा लागत आहेत. उड्डाणपुलावर चढण्या, उतरण्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक असणारे मार्गच देण्यात न आल्यामुळे स्थानिक नगरकरांना कोणताही उपयोग होत नाही. ज्यांना केडगाव उपनगरातून सावेडी उपनगराकडे जायचे आहे केवळ त्यांनाच काही अंशी पुलाचा उपयोग होत आहे. पुलावरून प्रवास करताना होणारे अपघात यामुळे नगरकर आजही सावेडी कडून केडगाव व केडगाव कडून सावेडीकडे जाताना अमरधाम मार्गे जाणाऱ्या रस्त्याचाच वापर करत आहेत. पुणे - औरंगाबाद प्रवास करणाऱ्यांचा मात्र यामुळे काही अंशी फायदा झाला आहे. मात्र ₹ ३३१ कोटी शहरात खर्चून देखील स्थानिक नगरकरांना हाती सरकारने केवळ बाबाजी का ठुल्लू दिला असल्याचा घाणाघात काळे यांनी केला आहे.
'तर' शहराचा खऱ्या अर्थाने फायदा झाला असता
उड्डाणपुलावर अवघ्या सहाच महिन्यात पडलेले खड्डे.
₹ ३३१ खर्चूनही उड्डाणपूलाचे काम अत्यंत निकृष्ट व सदोष झालेले आहे. यामुळे टक्केवारी खाणाऱ्या नेत्यांसह ठेकेदारांचा मोठा 'अर्थ' पूर्ण फायदा झाला असला तरी नगरकरांचा मात्र काहीच फायदा झालेला नाही. याउलट एवढेच पैसे शहरातील बाजारपेठेसह सर्व उपनगरांमधील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी खर्च करत भ्रष्टाचार न करता दर्जेदार कामे केली असती तर किमान पुढील २५ वर्षांसाठी शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असता, असे म्हणत किरण काळे यांनी सरकारचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे चांगलेच कान टोचले आहेत.
प्रकल्प संचालकांची भेट घेणार
दरम्यान, एनएचएआयच्या प्रकल्प संचालकांची किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार आहे. चौकशीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहे. पिलरवरील शिवसृष्टीचे काम अद्यापही अपूर्ण असून ते तात्काळ पूर्ण करण्याची मागणी ही काँग्रेस प्रशासनाकडे करणार आहे.
0 Comments