Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग न्यूज : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर कोतवालीत गुन्हा दाखल


शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर कोतवालीत गुन्हा दाखल 

प्रतिनिधी : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियमच्या कलम ३ व भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ अन्वये काळे यांच्या सह २५ काँग्रेस कार्यकर्त्यांवर आयुक्तांच्या आदेशावरून मनपा प्रभाग समिती क्रमांक २ चे प्रभारी प्रभाग अधिकारी रवींद्र कोतकर यांनी फिर्याद दिली आहे. 

दि. १७ मे रोजी काळे यांनी जुन्या महानगरपालिकेत काँग्रेस कार्यकर्त्यांसह "अमर रहे, अमर रहे.. अनिलभैय्या अमर रहे!" अशी घोषणाबाजी करत जुन्या महानगरपालिकेच्या वास्तूला "जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन" असे काँग्रेसच्या वतीने नामकरण केले होते. शहराचे आमदार, शिवसेनेचे महापौर, स्थायी समिती सभापती आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्याकडे काळे यांनी काँग्रेसच्या वतीने स्व. अनिल राठोड यांचा पूर्णाकृती पुतळा आणि वास्तूला त्यांचे नाव देण्याची लेखी मागणी केली होती. मात्र मनपाच्या महासभेमध्ये हा विषय मंजूर करण्यात आला नव्हता. शेवटी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच नामकरण करून टाकले होते. 

मनपात शिवसेनेचा महापौर व स्थायी समिती सभापती असून राष्ट्रवादीचा उपमहापौर आहे. स्व. अनिलभैय्या राठोड हे शिवसेनेचे मोठे नेते होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली शहरात सध्या विद्यमान असणाऱ्या नगरसेवकांना मतदारांनी निवडून दिले होते. शिवसेनेच्या दिवंगत नेत्याचे नाव जुन्या मनपा कार्यालयाला देण्याची मागणी काँग्रेसने केली होती. ती तात्काळ मान्य होईल अशी शहरात चर्चा होती. पण झाले उलटेच. नाव तर दिले गेले नाहीच. पण शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मनपा कडून त्यांच्याच नेत्याचे नाव देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांसह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून हा चर्चेचा विषय झाला आहे. 

दरम्यान, फिर्यादीत म्हटले आहे की, १७ मे रोजी मी अहमदनगर महानगरपालिका कार्यालयात असताना कार्यालयाच्या बाहेरील बाजूस अहमदनगर महानगरपालिका नावाच्या वर अनिल राठोड यांचे फोटो लावत त्यावर जननायक स्व.अनिलभैय्या राठोड अशी प्रिंट कुणीतरी अज्ञात इसमांनी चिटकवली. सायंकाळी साडेसहा वाजता वॉचमनने मला तसे कळल्यानंतर मी ते काढून टाकत कार्यालयात ठेवायला सांगितले. १८ मे रोजी सायंकाळी व्हिडिओ क्लिप पाहत असताना किरण काळे ते पोस्टर लावत असल्याचे मला त्यात पाहायला मिळाले. तशी बातमी मी दैनिकात देखील वाचली. त्यामध्ये काँग्रेसच्या वतीने दिवंगत नेते अनिल राठोड यांचा पूर्णाकृती पुतळा व नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र महासभेत अशी कोणती ही चर्चा झाली नव्हती. त्याचा निषेध करत काळे यांनी राठोड यांचे फोटो चिटकवले होते. १३ जून रोजी मनपा आयुक्त यांनी लेखी आदेश दिल्यावरून बेकायदेशीररित्या जमाव जमवून कार्यालयाच्या बाहेरील भिंतीस लोकांना दिसेल अशा ठिकाणी नामाकरण केले यावरून प्रभाग अधिकारी कोतकर यांनी फिर्याद दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे, संजय झिंजे, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ, गौरव घोरपडे, इंजिनियर सुजित क्षेत्रे, अभिनय गायकवाड, आर. आर. पाटील, प्रवीण गीते आदींसह एकूण २६ काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत किरण काळे हे काँग्रेस पक्षाच्या शिवनेरी कार्यालयात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments