Subscribe Us

Header Ads

लोकसभा निवडणूक ब्रेकिंग : गुंडाराजला पाठबळ देणारा नव्हे तर विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे : किरण काळे

 

रील वरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला खरपूस समाचार 

प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साधा माणूस आहेत. जसे स्व.अनिलभैय्या राठोड मोबाईल आमदार होते, तसे लंके या देशातील पहिले मोबाईल खासदार होतील. निलेश लंके रीलवर लोकप्रिय आहेत. कोविड काळात त्यांनी रियल मध्ये नुसते पारनेरच नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातून आलेल्या कोविड रुग्णांची सेवा केली. गोरगरिबांच्या अश्रू पुसण्याच काम केल. रीलवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की नगरकरांना गुंडाराजला पाठबळ देणारा नाही तर नगरकरांचा विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लगावला आहे. 

शहर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या लोकसभा निवडणूक नियोजनाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे.

महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी लंके यांच्यावर रिल वरून टीका करणाऱ्या शहराच्या आमदारांचे नाव न घेता त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, तरुण, महिला अशा विविध घटकांचे सक्षमपणे प्रश्न मांडणारा खासदार लंके यांच्या रूपाने जनता निवडून देणार आहे. प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करून घरोघरी जात प्रचार करत शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळून काम करण्याचे आवाहन यावेळी किरण काळे यांनी कार्यकर्त्यांना केले. 


इंग्रजी वरून खिजवणाऱ्यांवर टीका 

भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांनी लंके यांना इंग्रजीतून बोलून दाखवावे, आपण निवडणुकीचा अर्जच भरणार नाही, असे वक्तव्य नगर शहरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले होते. त्याचा समाचार घेताना काळे म्हणाले, तुम्ही कॉन्व्हेंट शाळेत शिकले. मोठ्या घरात जन्माला आले. तुमचा जन्म कारखानदार, सत्ता, मंत्रीपद असणाऱ्या घरात झाला. सोन्याचा आयता चमचा तुम्हाला जन्मापासून तुम्हाला तोंडात मिळाला आहे. पण आमचे लंके सामान्य कुटुंबातले आहेत. वडील शिक्षक, आई शेतकरी असणाऱ्या गरिबाचं लेकरू आहे. काँग्रेस नेते तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे देखील शिक्षण अल्प होतं. त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. मात्र त्यांनी विकासाच व्हिजन ठेवून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. विरोधी उमेदवारांना हे माहीत नाही असे दिसते की संसदेत मराठीतून देखील जनतेचे प्रश्न मांडता येतात. खा.ओमराजे निंबाळकर मराठीतच बोलतात. इंग्रजी वरून लंकेना खिजवण्याचं काम करणाऱ्यांना आता जनताच ईव्हीएमच्या माध्यमातून योग्य मतदान करत खिजवण्याच काम करेल, असा टोला काळे यांनी यावेळी लागला. 


शेतकरी अडचणीत म्हणून बाजारपेठ डबघाईला  

शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन देऊन देखील भाजप सरकारने पूर्ण केलं नाही. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. नगर दक्षिण देखील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या खिशात पैसेच नाहीत. नगर शहराची बाजारपेठ ही शहरासह आसपासच्या तालुक्यांतील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी ग्राहकांवर अवलंबून आहे. शेतकरीच अडचणीत असल्यामुळे बाजारपेठ देखील डबघाईला आली आहे. इन्कम टॅक्स कलम ४३ मध्ये दुरुस्ती करत ४५ दिवसांमध्ये व्यवहार पूर्ण करण्याची अट व्यापाऱ्यांना भाजप सरकारने घातली आहे. अन्यथा ते उत्पन्न म्हणून त्यावर कर लावण्याची तरतूद केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वेळच्या निवडणुकीत व्यापारी देखील भरघोस मते देऊन त्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी निलेश लंकेना विजयी करतील असा दावा यावेळी किरण काळेंनी केला. 


प्रभाग निहाय बैठकांचे नियोजन 

काळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्रभागातील प्रत्येक भागात, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घ्या. त्यांना बूथ पर्यंत मतदानासाठी येण्या करिता प्रवृत्त करा. प्रत्येकाला मतदान करण्यासाठी जागृत करा. महाविकास आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी समन्वय साधा. माजी मंत्री आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी काळेंनी कार्यकर्त्यांना दिल्या. 

ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, सांस्कृतिक विभागा शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे आदींनी मनोगत व्यक्त केले. महिला काँग्रेस, विद्यार्थी, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक, ओबीसी आघाडी, डॉक्टर, वकील सेल, सांस्कृतिक विभाग, कामगार आघाडी, साफसफाई कामगार विभाग, असंघटित व स्वयंरोजगार आघाडी यासह विविध फ्रंटल, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहराच्या सावेडी, केडगाव उपनगर भिंगार, मध्य शहरसह विविध भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments