Subscribe Us

Header Ads

संपादकीय : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा करिष्मा आजही कायम

संपादकीय : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा करिष्मा आजही कायम

अ-नगर प्राईड संपादकीय : 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादीच्या तरुण उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पहिल्यांदाच आमदार झालेल्या तनपुरेंच्या गळ्यात मामा असणाऱ्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळे मंत्री पदाची माळ देखील पडली. 

मात्र हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे पुन्हा राज्यात भाजपच्या पुढाकारातून शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या एकत्र येण्यातून राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आले आणि पुन्हा एकदा विधानसभेला पराभव झालेल्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना बळ मिळू लागले. 

कर्डिले हे तसे मूळचे भाजपचे नसले तरी देखील आजरोजी त्यांनी भाजपमध्ये स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे. जिल्ह्यात भाजपचे राज्य, देश स्तरावरील कोणीही नेते आले की त्यांची सर्वात पहिले हजेरी ही कर्डिले यांच्या निवासस्थानी असते. कालच नगरमध्ये उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय नेते असणाऱ्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील हेलिपॅडवर उतरताच सर्वात आधी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट दिली. 

त्याआधी नगरमध्ये येऊन गेलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील भेट दिली. माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील कोणीही भाजपचे वरिष्ठ नेते अहमदनगर जिल्ह्यात आले की ते आवर्जून कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट देतात. 

यामुळे मूळ भाजपच्या असणाऱ्या अनेक नेत्यांना अनेकदा आश्चर्य वाटते. त्यांना ही बाब रुचो अथवा ना रुचो भाजपचे वरिष्ठ नेते मात्र नगर जिल्ह्यामध्ये कर्डिले यांना विशेष महत्त्व देतात. हे यामुळे नाकारता येण्यासारखे नाही. कर्डिले यांनी आगामी विधानसभेसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. 

पराभूत झाले तरी देखील त्यांनी आपली तलवार म्यान केलेली नाही. आजही त्यांचा दिनक्रम पूर्वीसारखाच व्यस्त आहे. मतदारसंघातील सर्वच कार्यक्रमात त्यांची आजही पूर्वीसारखीच उपस्थिती असते. दिवाळीच्या फराळ कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा एकदा मतदारसंघाने कर्डीलेंच्या या कार्यक्रमाला झालेल्या मोठ्या गर्दीमुळे त्यांना गांभीर्याने घेत नसेल तर नवलच. 

कर्डिले हे मूळचे नगर तालुक्यातील असल्यामुळे आणि प्रत्येक निवडणुकीला त्यांचा मतदारसंघ कमी अधिक फरकाने बदलला गेल्यामुळे आज त्यांचा नगर तालुका, राहुरी तालुका, पाथर्डी तालुका, श्रीगोंदा तालुका, पारनेर तालुका अशा सगळ्याच लगतच्या तालुक्यांमध्ये प्रभाव निर्माण झाला आहे. 

नगर शहरात त्यांचे राष्ट्रवादीमध्ये असणारे जावई संग्राम जगताप हे आमदार आहेत. जगताप यांच्या पाठीशी देखील कर्डिले यांची राजकीय गोळा बेरीजेची ताकद ही ते भाजपमध्ये असले तरी देखील ते सातत्याने उभी करत असतात. हे काही लपून राहिलेले नाही. 

कर्डिले हे ग्रामीण भागाचे नेते असले तरी देखील नगर शहरात देखील त्यांचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग हा निर्णायक आहे. शहरात महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता ठरवण्याचे सर्वाधिकार त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी कर्डीले यांना प्रदान केले होते. 

आजही तो निर्णय प्रलंबित असला तरी देखील ग्रामीण भागाचे नेते असणाऱ्या कर्डीले यांच्याच हातात शहरातील भाजपच्या देखील नाड्या आहेत. हे शहरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या देखील आता अंगवळणी पडले आहे. 

काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल होत अल्पावधीत आपली मजबूत पकड निर्माण करणाऱ्या विखे पिता - पुत्रांकडून देखील कर्डिले यांना नेहमीच विशेष वागणूक दिली जाते. यामागे देखील कर्डिले यांचे असणारे उपद्रव मूल्य हेच महत्त्वाचे कारण आहे. हे नाकारता येणार नाही. कर्डिले यांच्या पराभवाला विखे कारणीभूत असल्याची कुजबुज अधून मधून होत असली तरी देखील येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी विखे यांना कर्डिले यांची मदत लागणार आहे. याची विखे यांना देखील पूर्ण जाणीव आहे. 

एकूणच सर्व परिस्थिती पाहता कर्डिले पुन्हा एकदा कमबॅक करणार की नाही, हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणूक होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. असे असले तरी आजरोजी मात्र शिवाजीराव कर्डिले यांचा करिष्मा आजही कायम आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येण्यासारखी नाही. 

Post a Comment

0 Comments