अ - प्राईड वेबन्यूज टीम : चित्रपट हे दृश्य माध्यम मनोरंजनाच्या क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. हे माध्यम एकाच वेळेस अनेक स्तरांवर वाटचाल करत आहे. नवनवीन तंत्रज्ञान या माध्यमामध्ये हाताळताना नव्या पिढीचे दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ पाहायला मिळत आहेत. पूर्वी चित्रपटातील देखील नाटकंप्रमाणे संवाद असायचे. इफेक्ट्स वापर नसायचा. कॅमेरे देखील साधे असायचे.
आता मात्र तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मिती अधिक प्रभावी होऊ लागली आहे. भारतामध्ये मुंबईत पहिला व्हर्चुअल चित्रपट प्रोडक्शन स्टुडिओ उभा राहिला आहे. दहिसरमध्ये चार मजली पन्नास हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात हा स्टुडिओ उभा करण्यात आला आहे. प्रत्येक मजल्यावर एक याप्रमाणे एकाच वेळी चार मजल्यांवर चार चित्रपट निर्मिती करणे यामुळे शक्य होणार आहे. विक्रम भट दिग्दर्शित 'जुदा होके भी' हा या स्टुडिओत तयार करण्यात आलेला पहिला चित्रपट असून तो जगभरात मल्टिप्लेक्सवर चांगली कमाई करत आहे.
दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ (प्रदर्शन ३ मे १९१३) या भारतीय बनावटीच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावेळी अत्यंत तुटपुंज्या तंत्रज्ञानाची मदत त्यांना झाली होती. मात्र फाळके यांच्या या पहिल्या प्रयोगापासून सुरू झालेल्या भारतीय चित्रपट निर्मिती व्यवसायाने आता व्हर्चुअल स्टुडिओतून चित्रपट निर्मिती करण्याच्या प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आगामी काळात बॉलीवूड मधील अनेक दिग्दर्शक या माध्यमाचा उपयोग करत अधिक प्रभावी चित्रपटांची निर्मिती यामुळे करू शकणार आहेत.
0 Comments