अ - प्राईड वेबन्यूज टीम : १९ नोव्हेंबरला नगर शहरातील पहिल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊन लोकार्पण होणार आहे. तशी घोषणा खा. डॉ. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांनी एकत्रित केली आहे. मात्र या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षांनी या विषयात उडी घेत शहरातील राजकीय वातावरण तापवले आहे. ९ नोव्हेंबरला नागरिकांनी स्वतः या पुलाचे उद्घाटन करावे असे आवाहन समाज माध्यमांवरून सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे. यामुळे बहुचर्चित उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी दांडी मारणार की येणार या चर्चेला शहरात उधाण आले आहे.
नुकतीच खा. विखे व आ. जगताप यांनी एकत्रित पुलाची पाहणी केली. यानंतर शिवसेनेने पुलाची पाहणी करत उद्घाटन केले. दिवंगत अनिल राठोड, दिवंगत दिलीप गांधी यांचे फोटो पुलावर झळकले. यावेळी पोलिसां समवेत शिवसैनिकांची झटापट देखील पाहायला मिळाली. समाज माध्यमां वरून हे श्रेय कोणत्या राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य नगरकरांचे आहे. तेव्हा उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा नारळ नागरिकांनीच फोडावा असे, आवाहन केले जात असून यासाठी ९ नोव्हेंबरचा मुहूर्त समाज माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे.
गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच विविध पद्धतीने होणाऱ्या उद्घाटनांच्या मालिकेमुळे आता गडकरींनी उद्घाटन करणे कितपत योग्य आहे अशी चर्चा नगरकरांमध्ये सुरू झाली आहे. त्यातच किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने आणखी दोन उड्डाण पुलांची गडकरींकडे मागणी केली आहे. न्यू आर्ट्स महाविद्यालय ते सक्कर चौक आणि जाधव पेट्रोल पंप (कल्याण रोड) ते नेप्ती नाका चौक अशा दोन उड्डाणपूलांचा आराखडाच त्यांनी गडकरींना सादर केला आहे. काळे यांनी या श्रेया वादामध्ये पडण्याचे टाळले असून नगरकरांसाठी मात्र दोन नवीन मागण्या केल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला काळेंनी शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनपा प्रशासन आणि आमदारांना घेरले आहे. आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना फाटा देत बुके, हारतुरे, केक नको. कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी शहरातील त्यांच्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो भेट म्हणून पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी मुंबईत उपोषण करत या फोटोंचे मुंबईत प्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मनसेने देखील उड्डाणपुलाच्या वादात उडी घेतली आहे. त्यांनी उड्डाणपूलाचे श्रेय हे दिवंगत दिलीप गांधी यांचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची या विषयात उडी पडल्यामुळे गडकरी आता या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी येणार की दांडी मारणार अशी कुजबूज नगरकरांमध्ये सुरू झाली आहे. गडकरी येणार की नाही हे येत्या १९ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार असून तोपर्यंत नगरकरांना मात्र वाट पहावी लागणार आहे.
0 Comments