महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांची होत आहे लूट, मदतीसाठी टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधा
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : महाराष्ट्र शासनाने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य या विशेष योजनेची अंमलबजावणी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या व्याधींवर शस्त्रक्रियांसाठी सुमारे दीड लाख रुपयांचे अनुदान शासन थेट नोंदणीकृत इस्पितळांना रुग्णांसाठी देत असते. काही आजारांच्यासाठी या अनुदानाची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंतची आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इस्पितळात दाखल होताच आरोग्य मित्राच्या माध्यमातून रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करून शस्त्रक्रियेपूर्वीच ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून मान्यता घेतली जाते. मात्र असे आढळून आले आहे की योजनेतील उपलब्ध होणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त देखील रुग्णांकडून काही खाजगी इस्पितळ रोख स्वरूपात विविध तपासण्यांसाठी पैसे घेत आहेत. यामुळे रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त होत आहेत.
जर अशा प्रकारची लूट रुग्णांकडून होत असेल तर रुग्ण अथवा रुग्णाचे नातेवाईक महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या 180023322200 या हेल्पलाइनवर थेट संपर्क साधू शकतात आणि त्यांना मिळत असणाऱ्या सोयी सुविधांची माहिती स्वतः मिळवू शकतात. यामुळे रुग्णांकडून होणारी लूट नियंत्रित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
0 Comments