Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग : नगरमध्ये काँग्रेसची मनपा निवडणुकीसाठी "या" पक्षाबरोबर आघाडीची तयारी...


भाजप, राष्ट्रवादीचा भ्रष्टाचारी बुरखा काँग्रेस फाडणार  

दहशतमुक्त शहर आणि सर्वांगीण विकास हेच काँग्रेसचे ध्येय 

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम: भाजप, राष्ट्रवादी मनपा अभद्र युतीच्या काळात  मोठे गैरव्यवहार झाले आहेत. ३२ कोटींच्या म्हासणवाटा महाघोटाळ्यां सारखे अनेक घोटाळे झाले आहेत. भ्रष्टाचार करत नगरकरांच्या पैशांवर डल्ला मारला गेला आहे. याचा बुरखा काँग्रेस फाडणार आहे. दहशतमुक्त शहर आणि सर्वांगीण विकास हेच काँग्रेसचे ध्येय आहे. आगामी मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. मात्र स्व. अनिलभैय्यांची शिवसेना सोबत आली तर आमची त्यांच्या सोबत विकास आघाडी करण्याची तयारी असेल, असा जाहीर प्रस्ताव शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने दिला आहे. 


शहर जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना 
जिल्हाध्यक्ष किरण काळे. 

निवडणुकीला अवघे अकरा महिने उरले आहे. प्रभागनिहाय मासिक आढावा काळे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. काळे म्हणाले की, काँग्रेस मनपा निवडणूक स्वबळावरच लढण्याची तयारी करत आहे. अनिलभैय्यांच्या शिवसेनेबद्दल अनिलभैय्यांमुळे नितांत आदर आहे. शिवसेना, राष्ट्रवादीची मनपात सत्ता आहे. अनिलभैय्या हयात असते तर त्यांनी कदापिही अशी आघाडी केली नसती. ते हयात भर दहशती विरुद्ध लढले. सच्चा शिवसैनिकांना ही आघाडी आजही मान्य नाही. 

भविष्यात भाजप, राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर मनपा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेने एकत्र येण्याची गरज आहे. निवडणूक पूर्व युती व्हावी अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास अनिलभैय्यांच्या विचारांची सत्ता निश्चितपणे मनपावर आणू, असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला. 

बैठकीत प्रभाग निहाय आढावा घेण्यात आला. बूथ स्तरावर किमान दहा कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात यावी. प्रभागातील युवक, महिला, नोकरदार, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, जेष्ठ नागरिक यांचा सहभाग ठेवावा. सर्व जातीय, धार्मिक घटकांना सामावून घ्यावे. नागरिकांच्या विविध समस्यांबाबत आवाज उठवावा. आंदोलन करावे. विकास कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे पितळ कार्यकर्त्यांनी उघडे पाडावे, असे आवाहन यावेळी काळे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक फैय्याज शेख, संतोषभाऊ जाधव, गणेश चव्हाण, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, विदयार्थी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे आदींसह सर्व फ्रंटल, आघाड्या, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments