Subscribe Us

Header Ads

संतापजनक - गुलमोहर रोडच्या निकृष्ट कामासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेले आमरण उपोषण म्हणजे नगरकरांच्या संयमाचा उद्रेक.. आता प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी निष्क्रिय भ्रष्ट नगरसेवक, पुढाऱ्यांच्या दारात जाण्याऐवजी स्वतः रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यावी : काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नगरकरांना आवाहन

कामात ठेकेदार संस्थेने रू. १.८० कोटी खड्ड्यात घातले, रू. २.७० कोटीही घशात घालण्याचा डाव - काळेंचा आरोप 

ज्येष्ठ नागरिकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेसने दिला पाठिंबा, मनपा आयुक्तांची ही भेट घेत वेधले लक्ष

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : मनपाच्या कर्म दरिद्रीपणामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करावे लागत आहे. ही नगर शहराच्या इतिहासातली अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. गुलमोहर रोडच्या कामात ठेकेदार संस्थेने रू. १.८० कोटी खड्ड्यात घातले आहेत. रू. २.७० कोटीही घशात घालण्याचा डाव सुरू आहे. निकृष्ट कामासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेले आमरण उपोषण म्हणजे शहरातील मनपाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात नगरकरांच्या संयमाचा उद्रेक झाला आहे. आता प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी इथून पुढे निष्क्रिय आणि भ्रष्ट नगरसेवक, पुढाऱ्यांच्या दारात जाण्याऐवजी स्वतः रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांना केले आहे.

शिरीष जानवे, महेश घावटे, अभिजीत दरेकर, दत्ता आंधळे, अभय खाबिया, ॲड. पठारे पाटील सर गुलमोहर रोड परिसरातील नागरिकांनी सुरु केलेल्या उपोषणाला भेट देत त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला असून मनपा आयुक्त यांचीही भेट घेत या विषयाकडे लक्ष वेधले आहे. उपोषणकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर काळे म्हणाले की, सुमारे रु. ४.५० कोटींची वर्क ऑर्डर ठेकेदार संस्थेला मनपाने दिली आहे. पूर्वी या रस्त्याची वर्क ऑर्डर कमी रकमेची होती. मात्र काही नगरसेवकांनी यामध्ये काम बंद पाडत ठेकेदाराशी अंधारात हात मिळवणी करून मनपा अधिकाऱ्यांशी संगनमत करत सुधारित वर्क ऑर्डर जारी केली. यामध्ये कामाची रक्कम जाणीवपूर्वक वाढवण्यात आली. 

गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. यात गंभीर त्रुटी असून रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या गटारींची तरतूद असून देखील गटारीचे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. काम निकृष्ट असून अद्याप पूर्ण झालेले नसताना देखील मनपाने संगनमत करत रु. १.८० कोटींचे बिल आगाऊ स्वरूपात ठेकेदाराला अदा केले आहे. हा भ्रष्टाचार नाही का ? असा संतप्त सवाल काळे यांनी केला आहे. 

काळेंनी आयुक्तांना धरले धारेवर : 

दरम्यान उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर काळे यांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास सखोल चर्चा केली. काळे यांनी अनेक सवाल यावेळी उपस्थित केले. १८ मीटर रुंदीचा रोड करणे नियोजित असताना प्रत्यक्षात कमी रुंदीचा रोड कुणाच्या दबावाखाली केला जात आहे ? या रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढायला मनपाच्या जेसीबीला लकवा झाला आहे. मात्र तुम्ही स्वतः जात प्रोफेसर चौकातील गोरगरिबांच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या जेसीबी लावून काढणार असल्याच्या वल्गना करत आहात. एकाला एक आणि दुसऱ्याला मात्र वेगळा न्याय देत आहात. रस्त्याच्यामध्ये येणारे लाईटचे पोल तसेच खाजगी कंपनीचे पोल काम सुरू करण्यापूर्वी स्थलांतरित करणे आवश्यक असताना देखील ती कामे जाणीवपूर्वक केली गेली नाहीत. साईड पट्ट्यांची काम होत नाहीत. आता थेट नागरिकांना उपोषण करावे लागत आहे. याला केवळ मनपा जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच आयुक्तांवर यावेळी केली. 

हाच का मनपाचा मॉडेल रोड ? :

शहर लोकप्रतिनिधी आणि शहर अभियंता यांनी आम्ही हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून करत असल्याचे फोटो सेशन करीत बढाया मारल्या होत्या. अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्याला जर तुम्ही मॉडेल रोड म्हणत असाल तर तुम्हाला आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मनपाची तिजोरी म्हणजे संगणमत करत दरोडा घालण्याचा अड्डा झाला आहे. बालिकाश्रम रोडच्या धर्तीवर गुलमोहर रोड मॉडेल रस्ता म्हणून विकसित करावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे. 

नागरिकांचे काँग्रेसकडून कौतुक : 

शहरातील गलथान कामांना विरोध करण्याची काँग्रेसची नेहमीच भूमिका असते. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांनी देखील रस्त्यावर उतरत त्यांचा हक्क आणि अधिकार असणाऱ्या नागरी सुविधांसाठी केलेले उपोषण हे नगरकर नागरिक संवेदनशील आणि जागरूक असल्याचे उदाहरण असल्याचे म्हणत उपोषणकर्ते नागरिकांचे काँग्रेसच्या वतीने काळे यांनी कौतुक केले आहे. या परिसरातील नागरिकांचा आदर्श घेत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी देखील त्यांच्या भागातील प्रश्नांसाठी स्वतः रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन नगरकरांना यावेळी काळे यांनी केले आहे. यावेळी अहमदनगर हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते सरचिटणीस कल्पक मिसाळ आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments