Subscribe Us

Header Ads

काँग्रेसचे नगर शहरात 'हाथ से हाथ जोडो' अभियान... कार्यकर्त्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात जात संपर्क मोहीम राबवावी : किरण काळे


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेससाठी देण्यात आलेल्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानाचा नुकताच संगमनेर येथे विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला होता. या अभियानाची अंमलबजावणी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात जात संपर्क मोहीम राबविण्याचे असे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी नुकतीच कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुमारे साडे तीन हजार किलोमीटर लांबीची जगातील आजवरची सर्वात मोठी पदयात्रा पूर्ण केली. यात्रेला महाराष्ट्रासह देशभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमानंतर पक्षाने आता कार्यकर्त्यांसाठी देशभर 'हाथ से हाथ जोडो' अभियान दिले आहे. आ. थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्ते समाजातील विविध जाती-धर्मांचे घटक, तसेच सामाजिक घटक, संघटना, समविचारी पक्ष, व्यापारी, नोकरदार, शिक्षक, डॉक्टर, वकील, कामगार, उद्योजक अशा विविध घटकांच्या भेटी घेऊन या माध्यमातून त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम करणार आहेत. 

काळे म्हणाले की, हा देश मूठभर उद्योगपतींचा देश झाला आहे. केवळ अदानी, अंबानी म्हणजे भारत नाही. देशातील सरकार हे केवळ फक्त मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत असून जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकसंख्या असणाऱ्या बहुसंख्य जनतेला मात्र यांनी बेरोजगारी, महागाईच्या खाईत अक्षरशः ढकलून दिले आहे. स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरू आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा दुरुपयोग करत राजकारण केले जात होतेच. मात्र आता निवडणूक आयोगाचा देखील वारेमाप गैरवापर सुरू झाला असाचा आरोप यावेळी त्यांनी केला. 

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रविण गीते, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्ष पूनमताई वन्नम, सांस्कृतिक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, ब्लॉक सचिव हनीफ मोहम्मद जहागीरदार, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, साफसफाई काँग्रेस विभाग शहर संघटक प्रशांत जाधव, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट गौरव घोरपडे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद दिवटे, केडगाव काँग्रेसचे राहुल सावंत, विद्यार्थी काँग्रेसचे वरिष्ठ शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर कांबळे, बालाजी जवंजाळ, सईद खान आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महागाई, बेरोजगारी विरोधात जनजागृती करा 

तरुणाईला पकोडे तळण्याचा अजब सल्ला दिला जातो. देशातील करोडो तरुण हात आज बेरोजगार आहेत. गॅस, तेल, डाळिंसह खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दुग्धजन्य पदार्थांवर देखिल आता कर आकारणी केली जात आहे. पेट्रोल, डिझेलने दरवाढीने महागाईचा भडका उडवला आहे. याबद्दल समाजात जात या अभियाना अंतर्गत जनजागृती काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन काळे यांनी यावेळी केले. 

Post a Comment

0 Comments