Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : मनपा रस्ते महाघोटाळा बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरण तापले.... इन कॅमेरा लाईव्ह टेस्ट करत दूध का दूध, पानी का पानी करुन दाखवा.. मनपा आयुक्त, शहर अभियंत्यांना काँग्रेसचे आव्हान


...अन्यथा "त्या" नगरसेवकांनी तुरुंगा जाण्यासाठी सज्ज राहावे, काँग्रेसचा खोचक सल्ला 

प्रतिनिधी : माहिती अधिकारात रस्त्यांच्या कामासंदर्भात उघड झालेल्या बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. २३ मेपर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर काळेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळेंची भेट घेत आयुक्त, शहर अभियंता, बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांना लेखी आव्हान दिले आहे. नगरकरांसमोर जाहीररीत्या इन कॅमेरा लाईव्ह टेस्ट करत दूध का दूध, पाणी का पाणी करुन दाखवत दोषींवर गुन्हे दाखल करा. अन्यथा आत्मदहनावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

मनपा आयुक्त पंकज जावळे यांची शहर काँग्रेसचे शिष्टमंडळाच्या वतीने चर्चा करताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे.  यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, प्रवीण गीते, निजाम जहागीरदार, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, प्रणव मकासरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, सोफियान रंगरेज, शंकर आव्हाड  आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काँग्रेसच्या लेखी निवेदनात काळेंनी म्हटले आहे की, रस्त्यांच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आहे. नागरिकांना खड्ड्यात घालत निकृष्ट कामे केल्यामुळे बनावट रिपोर्ट जोडले आहेत. जे जोडले ते सुद्धा प्रत्यक्ष पाहणी न करता बनावटरित्या तयार केलेत. टेस्ट रिपोर्टसाठीचे पत्र मनपाने थेट संबंधित यंत्रणेला देणे आवश्यक आहे. तपासणी अहवाल ही थेट मनपाकडे जमा होणे आवश्यक आहे. हा अहवाल गोपनीय स्वरूपाचा असल्यामुळे या प्रक्रियेशी ठेकेदाराचा संबंध असू नये. रिपोर्टसाठी सॅम्पल गोळा करताना त्रयस्त संस्था, मनपा अभियंते, ठेकेदार यांच्या सॅम्पल कलेक्शनवर जॉईंट स्वाक्षऱ्या, फोटो घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही प्रक्रिया केलेली नसल्याचा दावा काळेंनी केला आहे. बनावट रिपोर्ट देणारे, निकृष्ट काम करणारे ठेकेदार व पडताळणी न करता ते स्वीकारून त्या आधारे कोट्यावधींची देखके अदा करणारे सर्वच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

अभियंत्यांच्या अग्निपरीक्षेचा दिवस ठरला  

काँग्रेसने मनपाच्या सर्व अभियंत्यांना नागरिक, प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत इन कॅमेरा रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करत अग्निपरीक्षा देण्याचे आव्हान दिले आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या नुकत्याच भूमिपूजन झालेल्या पुतळ्याच्या चौथरा स्थळाजवळ शुक्रवार १९ मे रोजी सकाळी १०.३० ते १.०० वाजेपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते ठाण मांडणार आहेत. आयुक्तांसह अभियंत्यांनी बनावट रिपोर्ट देणाऱ्या अभियंत्यांना पाचारण करावे. प्रातिनिधिक स्वरूपात शहरातील किमान दहा रस्त्यांची लाईव्ह गुणवत्ता चाचणी करावी. नागरिक रस्ते अचानकपणे सुचवतील. यावेळी जागेवरच इस्टिमेट, एमबी रेकॉर्ड, बिल अदा करताना जोडलेली सर्व कागदपत्रे, यापूर्वी जोडलेले (बनावट) गुणवत्ता अहवाल यांची जाहीर पडताळणी मनपाने करून देत दूध का दूध, पाणी का पाणी करावे, असे आव्हान दिले आहे. मनपा ते स्वीकारते की पळ काढते, हे शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. मात्र या अनोख्या आव्हानाची नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. 

"या" टेस्ट ऑन द स्पॉट इन कॅमेरा करून दाखवा 

गुणवत्ता पडताळणीसाठी सीव्ह ॲनॅलिसिस, कॉम्प्रेशन व्हॅल्यू टेस्ट, डांबरासाठी पेनिट्रेशन टेस्ट, बीटूमीनीअस सरफेसची कोअर कटर मेथडद्वारे टेस्ट व इतर अनुषंगिक तांत्रिक टेस्ट लाईव्ह इन कॅमेरा करून दाखवाव्यात. यासाठी पीडब्ल्यूडीची फिरती लॅब व्हॅन पाचारण करावी. यासाठीचा खर्च काँग्रेस कार्यकर्ते जनहितासाठी वर्गणी करून मनपाला देणगी देतील. 


"त्यांनी" ही उपस्थित राहावे 

भ्रष्टाचारा न झाल्याचा महासभेत दावा करणारे नगरसेवक, तसेच शहराचे आमदार, मनपा पदाधिकारी यांनी देखील यावेळी उपस्थित रहावे. अशा प्रकारचे जनतेसमोर लाईव्ह टेस्टिंग पूर्वी कधीच झालेले नाही. कारभार स्वच्छ असेल तर जनतेसमोर पारदर्शकरित्या सिद्ध करून दाखवा, असे काँग्रेसने म्हटले आहे. मनपा हे आव्हान स्वीकारणार का ?, यासाठी नगरसेवक मनपाकडे आग्रह धरणार का ?, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


"त्या नगरसेवकांनी" प्रमाणपत्र द्यावीत 

काळे म्हणाले, घोटाळा झालेला नाही. मनपाची बदनामी केली जात आहे, असे महासभेत म्हणत नगरसेवकांनी भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण केली. नगरसेवकांनी भ्रष्टाचार न झाल्याची लेखी प्रमाणपत्र मनपाला द्यावीत, असा खोचक सल्ला काँग्रेसने दिला आहे. ती नागरिकांसाठी सोशल मीडियातून जाहीर करावीत. काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याच प्रभागातील रस्त्यांच्या निकृष्ट झालेल्या कामांचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून इन कॅमेरा जाहीर पोस्टमार्टम करून दाखवील. संबंधित नगरसेवकांनी यावेळी उपस्थित राहावे. निकृष्ट कामे झाल्याचे सिद्ध करून दाखवल्यास नगरसेवकांनी देखील अधिकाऱ्यांबरोबर तुरुंगात जाण्यासाठी सज्ज राहावे, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या इशाऱ्यानंतर कोणकोणते नगरसेवक असे प्रमाणपत्र जाहीर करतात, याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे. 


...म्हणून पाठराखण 

अनेक प्रभागात निकृष्ट कामे ही नगरसेवकांनीच आपल्या बगलबच्चांना ठेकेदार म्हणून उभे करत स्वतःच केली आहेत. जनतेची लूट केली आहे. आपला भ्रष्टाचार उघडा पडू नये म्हणून ते आता महासभेत भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 


पीडब्ल्यूडीकडून सखोल चौकशी करावी 

मनपा आयुक्त भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. सध्या चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त हे तांत्रिक अधिकारी नाहीत. ते परिपूर्ण चौकशी करू शकत नाहीत. त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नाशिक विभागाच्या तांत्रिक समितीद्वारे चौकशी व्हावी. थातूरमातूर चौकशी करून घोटाळा दडपण्याचा आयुक्तांचा प्रयत्न असल्याचे म्हणत पीडब्ल्यूडीद्वारे चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे.


Post a Comment

0 Comments