बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री व्हावे ही नगरसह राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा - किरण काळे
प्रतिनिधी : राजकारण हे महत्वकांक्षेवर असतं. माझा चाळीस वर्षांचा अनुभव आणि मी जे अनुभवलंय याचा उपयोग करण्यासाठीची मुख्यमंत्रीपदाची संधी आहे. मला महाराष्ट्र पूर्णपणे चांगला माहिती आहे. मला महाराष्ट्राचे प्रश्न माहिती आहेत. माणसं माहिती आहेत. आमचं काँग्रेसच नेटवर्क खूप मोठा आहे. हे सगळं मिळून खूप चांगलं काम महाराष्ट्रात होऊ शकतो. असा माझा आत्मविश्वास आहे. त्यामूळे मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती मी सोडणार नाही, अशी मनमोकळी स्पष्ट राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे दिलखुलास उत्तर दिले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की,
आज महाविकास आघाडी राज्यात विरोधी बाकावर आहे. विरोधकांत काँग्रेस आमदारांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्याकडे थोरात यांना विरोधी पक्षनेते करावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २०२४ नंतर राज्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे. जनतेची तशी भावना तयार झाली आहे. त्यामुळे सत्तेत येत असताना बाळासाहेब थोरात राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही नगर शहरासह राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
या मुलाखतीत २०२४ ला महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदावर तुमचा दावा असेल काय ? या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, होय. पण त्यासाठी आम्हाला संख्या घेऊन यावे लागेल.
यावेळी त्यांनी शरद पवारां समवेत असलेल्या आपल्या संबंधांचे अनेक पदर उलगडून सांगितले. शरद पवार आणि आमच्या कुटुंबाचे जूने घरोब्याचे संबंध आहेत. असा एक कालखंड होता की ते देशाचे कृषिमंत्री आणि त्याचवेळी मी राज्याचा कृषिमंत्री होतो. राज्यामध्ये दर आठवड्याला काही ना काही कार्यक्रम सातत्याने त्यांचे सुरू असायचे आणि प्रत्येक कार्यक्रम ते मला घेतल्याशिवाय करायचे नाहीत. पवार दर तीन महिन्यांनी देशातल्या सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांची दिल्लीत बैठक घ्यायचे. विविध राज्यांच्या कृषिमंत्र्यांशी संवाद साधताना त्यावेळी पक्षाच्या पलीकडे जाऊन ते संधी मला द्यायचे, असे एका प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले.
0 Comments