Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : पालकमंत्री नागपुरात, त्यांच्या महसूल विभागाच्या विरोधात माथाडी कामगारांचा "भव्य आक्रोश मोर्चा" नगर शहरात


महसूलमंत्र्यांबद्दल कामगारांमध्ये नाराजीची भावना... प्रशासनाची उडाली धावपळ

प्रतिनिधी : मागील सुमारे दोन वर्षांपासून कामगारांचे ठेकेदारांकडे असणारे कोट्यावधी रुपयांचे थकीत वेतन माथाडी मंडळ देण्यास तयार नाही. कामगारांच्या रेट्यानंतर ठेकेदारांच्या खाजगी मालमत्तांची जप्ती करून वसुलीची प्रक्रिया मंडळाने सुरू केली. मात्र महसूलमध्ये अपेक्षित कार्यवाही होत नाही. माथाडी मंडळ ठेकेदारांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांचा मुलाबाळांसह नगर शहराच्या बाजारपेठेतून येत्या १५ डिसेंबरला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे व शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे. 

सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस माथाडी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी आक्रोश मोर्चा बाबतचे लेखी पत्र दिले. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे नागपुरात आहेत. मात्र त्यांच्याच महसूल विभागाच्या अन्यायकारक कारभारा विरोधात नगर शहराच्या बाजारपेठेतून कामगारांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. यामुळे माथाडी मंडळ, जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांची भेट घेऊन शेकडो कामगारांच्या सह्यांचे लेखी पत्र देण्यात आले आहे. 

पत्राची प्रत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कामगार मंत्री, कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, कामगार सहआयुक्त (मुंबई), कामगार उपायुक्त (नाशिक), शहर उपजिल्हा पोलीस अधीक्षक, कोतवाली पोलीस निरीक्षक, तोफखाना पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आली आहे. यावेळी रोहिदास भालेराव, विलास गुंड, गणपत वाघमारे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, बाळासाहेब अनारसे, मंगेश एरंडे, संजय माळवे आदींसह कामगार उपस्थित होते. 

याबाबत माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मोठ्या संख्येने कामगार बांधव आपल्या कुटुंबीयांसह मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. महसूल मंत्री हेच पालकमंत्री असून जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांचेच चिरंजीव खासदार आहेत. आहेत. तरी देखील माथाडी मंडळ, महसूल विभाग मुठभर ठेकेदारांना वाचविण्यासाठी कामगारांवर अन्याय करत आहे. आम्ही आमच्या घामाचा, कष्टाचा थकित वेतनाचा मोबदला मागत आहोत. मात्र तो आम्हाला जाणीवपूर्वक दिला जात नाही. आम्ही सातत्याने अनेक आंदोलने, उपोषण, निदर्शने, कागदोपत्री पाठपुरावा केला. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. कामगारांना मोर्चा काढावा लागतो आहे हे दुर्दैवी आहे. 

महसूलमंत्र्यांबद्दल कामगारांमध्ये नाराजीची भावना 

महसूल मंत्री हे जिल्ह्याचे सुपुत्र असून देखील जिल्ह्यातीलच कामगारांकडे त्यांचे लक्ष नाही. माथाडी मंडळ कामगारांचे कोट्यावधी रूपयांचे थकीत वेतन द्यायला तयार नाही. त्यातच महसूल विभागाकडून वसुली कारवाई सुरू केल्याचा केवळ फार्स राबविला जात आहे. प्रत्यक्षात ठेकेदारांनाच पडद्या आडून मदत केली जात असल्यामुळे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बद्दल कामगारांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. 


कामगारांच्या प्रमुख चार मागण्या 

  • पहिल्या टप्प्यातील थकीत वसुली तात्काळ पूर्ण करण्यात यावी. 
  • दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाही तात्काळ सुरू करून कामगारांच्या खात्यात एक महिन्यात रक्कम जमा करावी. 
  • मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून माहे डिसेंबर पासून होणारा पगार सुधारित दराने देण्यात यावा.
  •  तसेच विळद माल धक्का येथे नव्याने सुरू करत आलेले काम बंद करून सर्व काम एकत्रितरित्या पूर्वी प्रमाणे अहमदनगर शहर रेल्वे स्टेशन माल धक्का येथेच सुरु ठेवावे. 

१३ डिसेंबर पूर्वी कामगारांचे मागण्या मान्य न झाल्यास १५ ला मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

मोर्चाचा मार्ग

सकाळी १०.३० वाजता निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते क्रांतीसुर्य महात्मा फुले पुतळा ते पंचपीर चावडी ते आशा टॉकीज ते शनी चौक ते पटवर्धन चौक ते चौपाटी कारंजा ते तेली खुंट ते एमजी रोड असा आहे. भिंगारवाला चौक येथे समारोपाची चौक सभा होणार आहे. त्यानंतर कामगारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देणार आहेत असल्याची माहिती विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे. 


Post a Comment

0 Comments