राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदीच्या प्रतिमा उलट्या टांगून मिरचीची धुरी देत "यांनी" केले रु. ३ लाखांचे बक्षीस जाहीर
अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केल्याने वाद निर्माण झाला आहे. नगर शहर जिल्हा काँग्रेसने चितळे रोडवरील आपल्या शिवनेरी कार्यालयासमोर याचा तीव्र निषेध करीत कोश्यारी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा माफीनामा दिला होता असे बरळणाऱ्या भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदीच्या प्रतिमा उलट्या टांगत त्यांना खालून मिरचीची धुरी देण्याचे आंदोलन केले आहे.
कोश्यारी यांनी आता आपला बाड-बिस्तरा गुंडाळून तात्काळ महाराष्ट्र सोडावा. शिवप्रेमींच्या संयमाची कुचेष्टा करू नये. केंद्राने त्यांना तात्काळ न हटवल्यास महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी आणि काँग्रेस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
कोश्यारी, त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानांवरून शहर काँग्रेसने काळे यांचे नेतृत्वाखाली आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. मिरचीची धुरी देण्याच्या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'काळी टोपी हटाव, महाराष्ट्र बचाव', 'भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय', 'नरेंद्र मोदी हाय हाय', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'सावित्रीमाई फुलेंचा जय जयकार' करत जोरदार घोषणाबाजी केली.
काळे यावेळी म्हणाले की, इतरांबद्दल बोलले की भाजप रस्त्यावर उतरते. मात्र भाजपचेच असणाऱ्या राज्यपाल आणि त्यांच्या प्रवक्त्याने महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीमाई फुले यांचा अवमान केल्यानंतर मात्र हे शेपूट घालून बिळात जाऊन बसतात.
मुळात भाजपवाल्यांचे प्रेम हे बेगडी प्रेम असून त्यांना केवळ निवडणुकांमध्येच महाराजांची, सावित्रीमाईंची आठवण होते.
यांचे हिंदुत्व देखील साफ खोटे आहे. इतिहासाचे विकृतीकरण करणे आणि महापुरुषांबद्दल समाजात नकारात्मकता निर्माण करणे हाच यांचा एकमेव अजेंडा असल्याचा घणाघात काळे यांनी केला आहे.
नगर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्याला रु. ३ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धोतर फेडणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. नगर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता यासाठी मोठ्या रक्कमेच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
राज्यपाल कोश्यारी मराठवाडा विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है.
या केलेल्या तुलनेमुळे शहर काँग्रेसने नगर शहरात आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला आहे. सावित्रीमाई फुले यांच्या बद्दल बोलताना देखील त्यांची यापूर्वी जीभ घसरली होती.
यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला, रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण गीते, प्रशांत जाधव, शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. अजित वाडेकर, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरज साठे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, चंकी कदम, माजी नगरसेवक फैयाज शेख, ब्लॉक काँग्रेस पदाधिकारी हनीफ जहागीरदार, गणेशभाऊ शिंदे सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, मागासवर्गीय काँग्रेसचे इंजि. सुजित क्षेत्रे, अपंग काँग्रेस विभागाचे शहर समन्वयक रंगरेज सोफियान, विद्यार्थी काँग्रेसचे किशोर कांबळे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष ऋतिक जाधव, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव भोसले आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments