Subscribe Us

Header Ads

मनपा क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार, स्पर्धा भरवल्या मात्र क्रीडापटूंसाठी सोयी सुविधांचा अभाव, आयुक्तांनी लक्ष घालण्याची प्रवीण गीते यांनी केली युवक व क्रीडा काँग्रेसच्या वतीने मागणी

 

मनपा क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार, स्पर्धा भरवल्या मात्र क्रीडापटूंसाठी सोयी सुविधांचा अभाव, आयुक्तांनी लक्ष घालण्याची प्रवीण गीते यांनी केली युवक व क्रीडा काँग्रेसच्या वतीने मागणी

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : अहमदनगर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने वाडीया पार्क येथे विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी, कराटे, ज्युडो, बॉक्सिंग, तलवारबाजी यासारख्या विविध खेळांचा यामध्ये समावेश आहे. सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही गटातून खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. मात्र स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच मनपाच्या क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. स्पर्धा भरवल्या आहेत. मात्र खेळाडूंसाठी सोयीसुविधांचा अभाव स्पर्धा ठिकाणी पहायला मिळाला आहे. यावर आक्षेप घेत युवक काँग्रेस व क्रीडा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी मनपा आयुक्तांनी तातडीने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.


खेळाडूंसाठीचे चेंजिंग रूम अस्वच्छ असल्यामुळे मुले, मुली खेळाडूंची गैरसोय होत आहे.

कबड्डी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धा सुरू असताना शालेय गटातील एक विद्यार्थी खेळाडू जखमी झाला. तो मैदानावर कोसळला. मात्र या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. प्रवीण गीते यांनी याबाबत दूरध्वनीद्वारे तात्काळ महानगरपालिका क्रीडा अधिकारी विलियम फिलिप्स यांच्याशी संपर्क साधत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. घडल्या प्रकाराचा गीतेंनी काँग्रेसच्या वतीने निषेध केला. ते चांगलेच संतप्त झाले होते. 

मैदानावर डॉक्टरांचे पथक उपलब्ध नसल्यामुळे खेळताना जखमी झालेला एक शालेय खेळाडू मैदानावरच कोसळला. तब्बल एक तासाने वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. 

त्यानंतर तब्बल एक तासाने डॉक्टर उपलब्ध झाले. वास्तविक पाहता स्पर्धेच्या ठिकाणी एक पूर्णवेळ ॲम्बुलन्स, डॉक्टरांचे नर्ससह वैद्यकीय पथक उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मात्र मनपाच्या भोंगळ कारभारामुळे कोणी स्पर्धेकडे लक्ष द्यायला तयार नाही. ही खेदाची बाब असल्याचे गीते यांनी म्हटले आहे. गीते यांच्यासह युवक व क्रीडा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घडल्या प्रकारानंतर क्रीडा संकुलातील स्पर्धा ठिकाणच्या खेळाडूंसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची यावेळी स्वतः पाहणी केली. यावेळी अनेक गंभीर बाबी समोर आल्या. 


खेळाडूंसाठीचे टॉयलेट अत्यंत अस्वच्छ असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे खेळाडूंमध्ये रोगराईला निमंत्रण मिळत आहे. 

शासनाच्या निधीतून खरेदी करत पिण्याच्या पाण्याचे वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले आहे. मात्र यामध्ये पाणीच नाही. यामुळे पाण्याच्या एका घोटासाठी खेळाडूंना वणवण भटकावे लागत आहे. खेळाडूंसाठी असणारे टॉयलेट अत्यंत घाणेरड्या स्थितीत असून याची गेले कित्येक दिवस साफसफाई केली गेलेली नाही. या ठिकाणी दुर्गंधी सुटलेली असून खेळाडूंना याचा वापर करता येत नाही. त्यामुळे लघुशंकेसाठी देखील खुल्या जागेचा आधार खेळाडूंना घ्यावा लागत आहे. तीच स्थिती खेळाडूंच्या चेंजिंग रूमची आहे. या ठिकाणी देखील प्रचंड अस्वच्छता असून खेळाडूंना मैदानावर सहकारी खेळाडूंचा अडसर करून कपडे बदलावे लागत आहेत. मात्र मुलींची मोठी गैरसोय यामुळे होत असून याकडे मनपा प्रशासन लक्ष द्यायला तयार नसल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.


शासनाच्या निधीतून महागडे वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले आहे. त्याच्या संरक्षणासाठी जाळी देखील बसविण्यात आली आहे. मात्र यात खेळाडूंना पिण्यासाठी पाणीच नळाला येत नाही. 

यावेळी उपस्थित खेळाडूंनी, शहराच्या विविध भागातून आलेल्या शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी गीते यांच्याकडे या असुविधेबद्दल संबंधितांचे लक्ष वेधण्याची विनंती केली. पालकांनी देखील यावेळी तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वैयक्तिक गटात रु. २५ तर सांघिक गटाकडून रु. ५० स्पर्धा शुल्क आकारण्यात येत आहे. मात्र कोणत्याच सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. गीते यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आणि खेळाडूंची गैरसोय पाहता मनपा प्रशासनाच्या तात्काळ हे निदर्शनास आणून दिले. या स्पर्धा पुढील सुमारे चार ते पाच दिवस सुरू राहणार आहेत. तात्काळ या सोयी सुविधा उपलब्ध करून देत येथील अस्वच्छता दूर केली नाही तर युवक काँग्रेस, क्रीडा काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा गीते यांनी मनपा क्रीडा विभागाला दिला आहे. 


क्रीडा संकुल आवारात ठीक-ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बाटल्यांचा खच पडला आहे.

तसेच वाडिया पार्क क्रीडा संकुलाची देखभाल करण्याची जबाबदारी ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची आहे. त्यांचा देखील यात हलगर्जीपणा दिसत आहे. मैदानात जागोजागी गवत उगवले आहे. मैदान हे मैदान राहिले नसून जंगल झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मैदानातच अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी देखील याबाबत तात्काळ उचित कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेसने केली आहेत. 

मैदानावरच असणारी विजेची डीपी उघडी असल्यामुळे शालेय गटातील खेळाडूंचा अपघात होण्याची भीती क्रीडा शिक्षक आणि पालकांकडून व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments