Subscribe Us

Header Ads

नितीन गडकरींचे ‘वेदान्ता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्पांवर पहिल्यांदाच जाहीर भाष्य, काय म्हणाले गडकरी ?


अ - प्राईड वेबन्यूज टीम : ‘वेदान्ता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले. यातून महाराष्ट्रामध्ये राजकीय रणकंदन उभे राहिले. महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजप - शिंदेसेना सरकारला या मुद्द्यावरून चांगलेच कोंडीत पकडले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमा निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी प्रकल्प गुजरातला जाण्यावरून पहिल्यांदाच भाष्य केले. 

एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, कोणत्या उद्योजकाने अथवा कंपनीने प्रकल्प कुठे सुरू करावा हा त्याचा अधिकार असतो, ना की त्या राज्याचा. शेवटी या मोठ्या गुंतवणुकी असतात. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांना त्याचा अधिकार असतो. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मी नागपूरचे प्रतिनिधित्व करतो..आमच्याकडे एअरबस आणि बोईंग या दोघांचे सुटे भाग टाल फॅक्टरीमध्ये बनवले जातात.आता राफेल आणि  फाल्कन ही तिथे आहेत. अलीकडील काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मूलभूत सेवा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र वाहन उद्योगात आघाडीवर आहे. अनेक मोठया वाहन निर्मिती कंपन्या पुण्यात आहेत. 

महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये विकास होत आहे. यापूर्वी विदर्भ, मराठवाडा मागे असल्याचा वाद व्हायचा. पण आता सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसतोय, असा दावा यावेळी गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला आहे. 

यावेळी गडकरी यांनी नागपूरच्या मिहानमध्ये टाटाने उद्योग स्थापन करावा यासाठी पत्र लिहिल्याचे सांगितले. मात्र टाटाने आपला प्रकल्प गुजरातकडे नेला आहे. यावर बोलताना गडकरी म्हणाले की, कर सवलती, कच्च्या मालाची उपलब्धता यासारख्या गोष्टींचाही परिणाम होत असतो. देशातील काही राज्यांमध्ये अधिक कर सवलत दिली जाते. गुजरात प्रगतीच्या वाटेवर आहे. पण महाराष्ट्रही प्रगतीपथावर असल्याचे मत यावेळी गडकरी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments