Subscribe Us

Header Ads

संपादकीय ll रविवार विशेष ll नामांतरण की विभाजन ? नेत्यांच्या भूमिका विकासासाठी की राजकीय पोळ्या भाजण्यासाठी ?


संपादकीय II रविवार विशेष II 

तात्याराव नगरकर यांच्या निर्भीड, परखड लेखणीतून...

विशेष सदर - एक शहर बारा भानगडी

भाजप आ. गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी पुन्हा एकदा केली. भाजप खा. सुजय विखे यांनी जर विकासाचा आराखडा असेल तर विभाजन करा. नाही तर मी विभाजन होऊ देणार नाही, असे म्हणत संदिग्ध भूमिका घेतली. तर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी नामांतर करायचे असेल तर करा. मात्र विभाजन आधी करा, असे म्हणत विभाजनाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले. शिवसेना, मनसे यांनी अंबिकानगर करा असे म्हटले आहे. तर जैन समाजाच्या वतीने आनंदनगरची, माळी समाजाच्या वतीने फुलेनगरची मागणी पुढे आली आहे. काँग्रेसच्या किरण काळे यांनी, नामांतर करून नेमके साध्य काय करायचे आहे ? नामांतरामुळे विकास होणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. अहमदनगर हे नाव बदलले जाऊ नये यासाठी मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजीचा अंडर करंट पाहायला मिळत आहे. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी पहिले शहर विकासासाठी दहा हजार कोटींचा निधी द्या, असा मुद्दा पुढे केला आहे. एकूणच नामांतरण की विभाजन यावरून नेत्यांच्या भूमिका विकासासाठी की राजकीय पोळ्या भाजण्यासाठी ? असा सवाल आता जनता करू लागली आहे. 

अहमदनगरच्या स्थापनेला सुमारे सव्वा पाचशे वर्षांहून अधिक काळ उलटला आहे बहामनी सल्तनतच्या विभाजनानंतर सीना नदीच्या काठावर निजामशाहीची स्थापना करत अहमदनगर वसवले. स्थापना दिन माहित असलेल्या अत्यंत अपवादात्मक जिल्ह्यांपैकी अहमदनगर हे एक आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा तर आहेच. मात्र देशातील सहा राज्यांपेक्षा मोठे क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे. यापूर्वी देखील या जिल्ह्याच्या विभाजनासाठी अनेक वेळा चर्चा केली गेली. जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे हे आजच्या घडीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेते आहेत. हे दोन्ही नेते मात्र उत्तरेचे आहेत. दक्षिणेत राज्य पातळीवर नेतृत्व करणारे वजनदार एकही नेतृत्व आजमीतीस जिल्ह्यामध्ये प्रबळ असल्याचे पाहायला मिळत नाही. 

बबनराव पाचपुते, राम शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. मात्र थोरात, विखेंसारखा दबदबा त्यांना निर्माण करता आला नाही. सुजय विखे हे भाजपचे नेते आहेत. खासदार आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाच्या पडळकर यांनी केलेल्या मागणीला त्यांनी ना समर्थन दिले, आहे ना विरोध केला. राजकारणात जर - तरची भाषा बोलणे म्हणजे दोन्ही डगरींवर हात ठेवल्यासारखे आहे. विखे यांच्या याच जर - तरच्या भूमिकेमुळे त्यांनी अहमदनगरच्या नामांतराला विरोध केला नाही असे गृहीत धरून समाज माध्यमांवर हिंदुत्ववादी विचारांच्या नेटीझन्स कडून विरोध होत असल्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अहिल्या नगर नावाला विरोध केल्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा दावा धनगर समाजाच्या वतीने केला जात आहे. 

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत. मात्र नामांतरावर यापैकी फक्त नगर शहराच्या राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांनीच आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली आहे. त्यांनी नामांतराला विरोध केला नाही ही आश्चर्याची बाब आहे. खरे तर राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष विचारांचा पक्ष मानला जातो. त्यामुळे मुस्लिम समाजाचा त्यांना निवडून आणण्यामध्ये मोठा वाटा आहे. हे जग जाहीर आहे. असे असतानाही त्यांनी विभाजनाच्या मुद्द्याला प्राधान्य देत आधी विभाजन करा असे म्हणत त्यामुळे विकास होईल. त्याला गती येईल, असे म्हटले आहे. 

जगताप यांना विभाजन करून खरे तर विकास हवा आहे की विखे, थोरात यांच्या तावडीतून नगर दक्षिण स्वतंत्र करून घेत राजकीयदृष्ट्या या संधीचा फायदा उठवायचा आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मुळात विखे - जगताप यांची राजकीय मैत्री सर्वश्रुत असताना विभाजनाच्या मुद्द्यावर दोघांच्या परस्परविरोधी भूमिका आहेत. विखे दक्षिणेचे खासदार असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना जिल्हा एकसंध राहणे योग्य वाटणे राजकीयदृष्ट्या सोयीचे आहे. त्यातच आता त्यांचे वडील हे पालकमंत्री असल्यामुळे आणि जिल्हा भाजपवर विखे परिवाराचे काँग्रेस मधून अगदी अलीकडच्या काळात येऊन देखील एक हाती वर्चस्व आल्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धकांना आणि पक्षाबाहेरच्या ही स्पर्धकांना शह देण्याची आपली ताकद आहे, असा त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे ऋणानुबंध मुकुंदनगरच्या शहा-शरिफ दर्ग्याशी जोडलेले आहेत हे वास्तव आहे. नुसत्या हिंदुत्वाचीच नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली होती. त्यांच्या दरबारात मुस्लिम समाजाचे सरदार, मावळे होते हे सुद्धा सर्वश्रुत आहे. त्याही वेळी अहमदनगर हेच नाव होते. एका मुस्लिम समाजाचे श्रद्धा व धार्मिकस्थान असणाऱ्या दर्ग्यात हिंदू धर्माच्या भोसले घराण्याने केलेला नवस हे हिंदू - मुस्लिम एकतेचे आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे जाज्वल्य उदाहरण आहे. नगर शहराला काही अपवादात्मक दंगलींचा इतिहास वगळला तर अनेक शतकांचा धार्मिक एकतेचा इतिहास आहे. 

केडगावला अंबिका देवीचे मंदिर आहे. नगरकरांची आस्था त्या ठिकाणी आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 च्या अहमदनगरच्या सभेत नगरला अंबिकानगर नाव द्यावे, असे म्हटले होते. त्यामुळे नामांतराची मागणी ही काही अलीकडची नसून याला सुमारे 30 वर्षांचा पूर्वइतिहास आहे. आता मनसेने देखील या नावाला सहमती दर्शवली आहे. नगरच्या बाजारपेठेवर जैन धर्माचे वर्चस्व आहे. त्यांची व्यावसायिक ताकदही मोठी आहे. या समूहाच्या वतीने आनंदऋषीजी महाराजांचे जन्मस्थळ अहमदनगर जिल्हा असल्यामुळे नामांतरच करायचे असेल तर आनंदनगर नाव देण्याची मागणी पुढे करण्यात आली आहे. 

तर माळी समाजाच्या वतीने फुलेनगरची मागणी पुढे आली आहे. काँग्रेसच्या किरण काळे यांनी भूमिका मांडताना म्हटले आहे की नामांतराने विकास होणार आहे का ? इथले रस्त्याचे, पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत का ? असे म्हणत एक प्रकारे त्यांनीही नामांतराला बगल देत विकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वखाली काम करणाऱ्या काळेंनी थोरात यांची राजकीय अडचण होऊ नये याची काळजी घेतली विभाजनाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे. 

काही सामाजिक धुरिणांनी नगर शहराच्या विकासासाठी दहा हजार कोटींचा निधी द्या. पर्यटन विकास करा, असे म्हणत नामांतराला विरोध केला आहे. समाज माध्यमांवरच्या प्रतिक्रिया पाहता ज्यामध्ये मुस्लिम समजा बरोबरच अन्य धर्मीयांचा देखील मोठा सहभाग दिसत आहे, त्यांच्या म्हणण्याचा रोख हा नामांतराला सहमती नसणारा आहे. अहमदनगर मुस्लिम धर्मीय राजाने वसवले असेल तरी देखील मागील सव्वा पाचशे वर्षांमध्ये अनेक पिढ्या या नावाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या नावा विषयी नागरिकांना कधी अडचण असल्याचे किंवा या शहराचे नाव बदलावरून सामान्य अहमदनगरकरांनी कधी कुठला मोर्चा काढल्याचे आजपर्यंत तरी पाहायला मिळालेले नाही. 

मग नामांतर की विभाजन ही मागणी जर सामान्य अहमदनगरकरांकडून पुढे आलेली नसताना देखील राजकीय पुढाऱ्यांनी पुढे आणली आहे. त्यांनीच त्यावर परस्परविरोधी मते मांडला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांनी यावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. आज अहमदनगर, अंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर, फुलेनगर या नावांचे पर्याय पुढे आले आहेत. जसा वर नमूद महापुरुषांचा अहमदनगरशी संबंध राहिला आहे तसा संबंध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पटवर्धन बंधू, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू अशा अनेक महान व्यक्तींचा देखिल राहिला आहे. 

ही नावे द्यायची की अजून उद्या दुसऱ्या कुठल्या समाजाने वेगळी नावं सुचवली तर ती द्यायची हे सर्वस्वी राजकारणांच्या हातात आहे. हे न समजण्या इतपत सामान्य जनता नक्कीच दुधखुळी नाही. मात्र नामांतरण, विभाजनाच्या वादात शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सर्वच राजकीय नेते स्पष्ट, आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र वेगवेगळ्या समाजांची नावे पुढे करत वेगवेगळे धर्म, जाती यांच्यामध्ये यामुळे जातीय, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून राजकीय नेत्यांनी निवडणुकां वेळी आपली राजकीय पोळी भाजून घेतली तर नागरिकांनी आश्चर्य वाटून घेऊ नये. 

मुळात आता मतदाराच जागरूक होत आहे. अशा राजकीय मुद्द्यांना हवा देण्या पेक्षा त्यांना शहर आणि जिल्ह्याचा विकास हवा आहे. मी तात्याराव नगरकर देखील सामान्य अहमदनगरकरांच्या विचारांचा असून आधी नामांतरण, विभाजन करू इच्छिणाऱ्यांनी पहिले विकासासाठी दहा - वीस हजार कोटींचा निधी आणावा... आणि मगच नामांतर, विभाजनासाठी जाहीररित्या मतदान घ्यावे. मात्र विकास न करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि पक्षांना या मुद्द्यावरून जातीय, धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा राजकीय पोळ्या भाजणाऱ्या राजकीय नेत्यांचा आणि पक्षांचा मी तात्याराव नगरकर जाहीर निषेध करतो. नागरिक हो, तुम्ही काय करणार आहात हे आता तुम्ही स्पष्टच ठरवले पाहिजे. कारण धर्म ही केवळ अफूची गोळी असून इंग्रजांनी देखील याचा गैरवापर केला होता. आधुनिक काळात लोकशाही देशात समाज पुढे जायचा असेल तर विकास होणे ही काळाची गरज आहे. जागरूक नागरिकांनी विकास हवा की राजकारण यावर मनात स्पष्टता आणत निवडणूक काळात राजकीय पोळी भाजणाऱ्यांना गुप्त मतदान पद्धतीने दिलेले स्वातंत्र्य आजमावत लोकशाहीचा इंगा अहमदनगरकरांनी दाखवला पाहिजे. तूर्तास एवढेच. 

Post a Comment

0 Comments